Education | 10वी-12वी परीक्षेत गैरप्रकार केल्यास होणार जेल; ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा’ लागू

SubEditor | Dipak Shirasath

नांदेड | २३.२ | रयत समाचार

(Education) जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा केंद्रांवर पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन अधिक कडक झाले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे सदस्य सचिव यांनी स्पष्ट केले आहे की, सर्व परीक्षा केंद्रांवर ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा १९८२’ लागू करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

(Education) येत्या २५ फेब्रुवारी रोजी १२ वीचा जीवशास्त्र आणि २७ फेब्रुवारी रोजी १० वीचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. या महत्त्वपूर्ण पेपर्ससह होणाऱ्या सर्वच विषयांच्या परीक्षेसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

(Education) या कायद्यानुसार केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षक, कर्मचारी आणि संस्थाचालकही कारवाईच्या कक्षेत येणार आहेत. प्रश्नपत्रिका गोपनीयता (कलम ३) : पेपर फुटणे, सोशल मीडियावर पसरवणे किंवा अधिकृत घोषणेपूर्वी तो मिळवणे हा गंभीर गुन्हा आहे. उत्तरपत्रिका छेडछाड (कलम ५) : विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत बदल करणे, कोरी पाने जोडणे किंवा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी कॉपीसाठी मदत करणे यावर बंदी आहे. कामात अडथळा (कलम ४) : परीक्षा ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याला धमकावणे किंवा कामात अडथळा आणल्यास कारवाई होईल. दोषी आढळल्यास ३ महिने ते १ वर्षापर्यंतचा कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा ‘अजामीनपात्र’ असून पोलिसांना विनापरवाना अटक करण्याचे अधिकार आहेत.

परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये जर कोणी जाणूनबुजून छेडछाड केली किंवा फुटेज देण्यास नकार दिला, तर तो पुराव्याशी छेडछाड केल्याचा गंभीर गुन्हा मानला जाईल. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) दर्जाचे अधिकारी करणार आहेत.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि संस्था सचिवांना या कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share This Article