Ipl

Art | महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिमफेरी मुंबईत; 17 महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ११.३ | गुरुदत्त वाकदेकर

(Art) महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी दि. १० ते १४ मार्च २०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे रंगत आहे. राज्यातील विविध १७ महाविद्यालयांतील विद्यार्थी कलाकार या अंतिम फेरीत सहभागी झाले असून नाट्यप्रेमींना वैविध्यपूर्ण एकांकिका पाहण्याची संधी मिळत आहे.

(Art) अंतिम फेरीचे उद्घाटन ता.१० मार्च रोजी दुपारी १२ वाजता साहित्यिक, कवी, नाटककार व निर्माते तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे माजी संचालक संजय कृष्णाजी पाटील आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अनिल बांदिवडेकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ही तिन्ही मान्यवर काम पाहत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शब्दगुच्छ देऊन स्वागत केले.

(Art) उद्घाटन प्रसंगी बोलताना संजय कृष्णाजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्य नाट्य स्पर्धा सलग ६४ वर्षे सातत्याने आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्व संघांचे त्यांनी अभिनंदन केले. एकांकिका स्पर्धांमधून उत्तम कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि संगीतकार घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -
Ad image

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेची आवड वाढविणे तसेच नवोदित लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मा. सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे या स्पर्धेला मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ८३ एकांकिका सादर करण्यात आल्या होत्या.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध १७ महाविद्यालयांचे संघ आपापल्या एकांकिका सादर करत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळून मराठी रंगभूमीला नव्या पिढीतील कलाकार घडण्यास हातभार लागेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. अंतिम फेरीतील सर्व एकांकिकांचा प्रवेश रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. एकांकिकांच्या प्रवेशिका नाट्यगृहावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अंतिम फेरीतील सादरीकरणे पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Share This Article