अहमदनगर | रयत समाचार
Crime : शहरातील सय्यद घोडपीर दर्गा या हिंदू-मुस्लीम समाजाच्या श्रद्धास्थानावर २४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी जेसीबीने तोडफोड केली. या कृत्यामुळे दोन्ही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या प्रकरणी वसिम रौफ खान, रा. पटवर्धन चौक, अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७६१/२०२५ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९८, २९९, ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासात जेसीबी मालक अरुण गोविंद खरात (रा. समता चौक, सावेडी) याची चौकशी करण्यात आली असता, त्याने जेसीबी चालक बबलू पाल (रा. भुतकरवाडी) याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. पोलिसांनी सापळा रचून बबलू पाल याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने साथीदारांची नावेही सांगितली.
दरम्यान, दुसरा आरोपी योगेश सखाराम झोंड (रा. वाळकी, हल्ली रा. भुतकरवाडी) पोलिसांच्या पथकाला मिळून आला. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
या संपूर्ण कारवाईत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचेही मार्गदर्शन लाभले. या घटनेने शहरात खळबळ माजली असली तरी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे समाजात दिलासा निर्माण झाला आहे.
हे हि वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.