(Art) येथील बालगंधर्व कलादालनात ता.५ एप्रिल रोजी ‘विवेकरेषा’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन दिग्दर्शक नागराज मंजुळे, लेखक अरविंद जगताप आणि व्यंगचित्रकार मंजूल यांच्या हस्ते करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांनी ही कल्पना मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी ऐकवली होती.
(Art) याविषयी अधिक माहिती देताना सर्जेराव म्हणाले, आणखी एक संकल्पना सत्यात उतरली. आमची ओळख नसतानाही त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून यासाठी संपूर्ण सहाय्य केले. मला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडून घेतले त्याबद्दल खूप धन्यवाद. आजचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. इतक्या मोठ्या मान्यवरांसमोर माझे मत मला मांडायला मिळाले. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भारतातील प्रतिभावंत व्यंगचित्रकारांनी देखील माझ्यावर विश्वास ठेवून कोणतेही मानधन न घेता त्यांची चित्रे या समाजप्रबोधनाच्या कामासाठी पाठवली. व्यंगचित्रकार भटू बागले यांनी मान्यवरांची अतिशय सुंदर अर्कचित्रे रेखाटून पाठवली. त्याबद्दल त्यांचे खूप आभार.
(Art) सर्जेराव पुढे म्हणाले, गेले काही दिवस अंनिसचे कार्यकर्ते आणि माझ्या जिवलग मित्रांनी हे प्रदर्शन घडवून आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले. फक्त संकल्पना असून चालत नाही, तर तिच्या पूर्तीसाठी त्यामागे असे हात असावे लागतात. तेव्हाच हे साध्य होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांची जिद्द आणि या कामाविषयीचं प्रेम हे पाहून मी भारावून गेलो आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर विचारस्वरूपाने जिवंत आहेत हे जाणवले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या मुलाखती त्यांची पुस्तके वाचण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज त्यांच्या संस्थेशी, कामाशी जोडण्यापर्यंत येऊन पोहोचला याचा मला खूप आनंद आहे. ही विवेकाची वाट अजून चालायची आहे. आता कुठेशी सुरुवात झाली आहे.
गौरव सर्जेराव यांनी आवाहन केले की, पुढचे आणखी दोन दिवस हे प्रदर्शन पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. तेव्हा नक्की भेट द्या.