(Art) सांगलीतील प्रसिद्ध तरुण व्यंगचित्रकार रोहित कबाडे यांना नुकतीच बारामतीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून थेट कौतुकाची थाप मिळाली. आमदार पवार यांनी रोहित कबाडे यांना फोन करून त्यांच्या राजकीय व्यंगचित्र कौशल्याचे विशेष अभिनंदन केले.
(Art) अलीकडे पार पडलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी रंगल्या. याच पार्श्वभूमीवर रोहित कबाडे यांनी साकारलेले एक तीव्र भाष्य करणारे व्यंगचित्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
(Art) “राज्यात शेतकरी, महिला, युवक, शिक्षक, विद्यार्थी, कामगार – या सर्वच घटकांचे प्रश्न गंभीर आहेत. गुन्हेगारी वाढतेय, राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतोय… आणि याला उत्तरदायी असलेले सत्ताधारी काय करत आहेत? तर हाच त्यावरचं व्हॉट्सअॅपवर आलेले अत्यंत बोलके चित्र!” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र शेअर करत “#बघा_आणि_थंड_बसा” असा टोकदार टोमणा सत्ताधाऱ्यांना मारला.
विशेष म्हणजे, हे व्यंगचित्र विधान भवन परिसरात चर्चेचा विषय ठरले असल्याचे खुद्द आमदार पवार यांनी कबाडे यांना सांगितले.
“एखाद्या सामान्य कलाकाराने साकारलेलं चित्र राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरते आणि त्यावर आमदार स्वतः फोन करून कौतुक करतात, हे माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे,” असं रोहित कबाडे यांनी नमूद केले.