Art | पुण्याच्या प्रकाशचित्रकारांचा ‘दृष्टिकोन २०२६’ ; आनंदाचे ‘प्रांजळ चेहरे’ अनुभवण्याची सुवर्णसंधी

SubEditor | Dipak Shirasath

पुणे | २८.२ | रयत समाचार

(Art) पुण्यातील photographers@pune (P@P) या प्रकाशचित्रकारांच्या समूहातर्फे आयोजित करण्यात आलेले ‘Drushtikon 2026’ – Happy Lens हे बहुचर्चित छायाचित्र प्रदर्शन काल ता.२७ रोजी उत्साहात सुरू झाले. “आनंद नेमका कशात असतो?” या प्रश्नाचा शोध घेणाऱ्या या प्रदर्शनाने पहिल्याच दिवशी रसिकांचे लक्ष वेधून घेतले.

(Art) गेल्या दोन वर्षांपासून P@P समूहातील छायाचित्रकारांनी विविध वयोगटांतील आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या असंख्य व्यक्तींशी संवाद साधत त्यांच्या आनंदाचा शोध घेतला. त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण, भावविश्व आणि प्रेरणादायी कथा कॅमेऱ्यात टिपल्या. या दीर्घ प्रवासाचे फलित म्हणजे सुमारे चाळीस निवडक छायाचित्रांचे हे प्रभावी प्रदर्शन.

(Art) या प्रदर्शनात केवळ छायाचित्रेच नव्हेत, तर प्रत्येक छायाचित्रामागील व्यक्तीच्या आनंदाची कहाणीही मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना अंतर्मुख करते आणि “प्रांजळ चेहऱ्यांमधील आनंद” अनुभवण्याची संधी देते.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध गायक, संगीतकार व दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी त्यांनी कवी बा.भ. बोरकर यांच्या “देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे” या ओळी उद्धृत करत प्रदर्शनाचे सार शब्दबद्ध केले.

हे प्रदर्शन राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे भरविण्यात आले आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार.

आनंदाचे विविध रंग, निरागस हास्य आणि जीवनातील सकारात्मकता अनुभवण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एक विलक्षण संधी आहे. पुणेकरांनी वेळ काढून आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने प्रसाद शिरगावकर यांनी केले.

Share This Article