श्रीगोंदा | २२ डिसेंबर | माधव बनसुडे
Ahilyanagar News परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत संशयितरित्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ ता. २० डिसेंबर रोजी श्रीगोंद्यात तहसील कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन व निषेध सभा पार पडली.
परभणी येथे संविधान प्रेमी आणि आंबेडकरी समाजाच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी महिला, तरुण व मुलांना अटक करून कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ श्रीगोंदा आणि पंचक्रोशीतील विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.या निषेध सभेत प्रशासन व पोलीस यांच्यावर तीव्र स्वरुपात टीका करण्यात आली.
यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या संविधान विटंबनेच्या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, पोलीस मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दलित समाजाविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, महिला व तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी अनिल ठवाळ, सुनील ओहोळ, भगवान गोरखे, मुकुंद सोनटक्के, कांतीलाल कोकाटे, चंदन घोडके, शिवाजी ननवरे, नंदकुमार ससाणे, अमर घोडके इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करतांना परभणी, बीड मधील घटना आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
आंदोलनाच्या शेवटी निवासी नायब तहसीलदार अमोल बन व पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार यांनी आंदोलकांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. थोर महापुरुषांच्या घोषणा देत आंदोलन शांततेत संपन्न झाले.
या धरणे आंदोलनात शरद चव्हाण, शिवाजी ननवरे, संजय रणसिंग, भिमराव घोडके, नितीन जावळे, अंबादास घोडके, सत्यवान शिंदे, उत्तम शिंदे, उमाशंकर यादव, राजू शिंदे, रवीनंद कुमार, शहानवाज शेख, गणेश बाळासाहेब काते, रामफळे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा : जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ