मुंबई | ६ ऑक्टोबर | प्रतिनिधी
Politics राजर्षी शाहू महाराजांचे वंशज माजी खासदार छत्रपती संभाजी हे प्रधानमंत्री मोदी यांनी उदघाटन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यास निघाले आहेत. युती सरकारने राज्यातील शिवप्रेमी जनतेचे मतदान घेण्यासाठी शिवरायांचा वापर केला. त्यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारू म्हणून मोठा उदघाटन इव्हेंट केला, कोट्यावधी रूपयांचा खर्च केला पण अजूनही त्याचे नक्की काय झाले हे शिवप्रेमींना समजले नाही.
त्यामुळे शिवरायांचे वंशज कोल्हापूर छत्रपती संभाजी यांनी शिवप्रेमींसह आज गेट वे ऑफ इंडियाकडे कूच केले आहे. ‘चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला’ असे आजच्या मोहिमेचे नाव असून सकाळी स्वराज्य भवन, शिवाजीनगर पुणे येथून स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे सर्व शिवभक्तांसह चार चाकी वाहन रॅलीने मुंबई च्या दिशेने रवाना झाले. सकाळी ८.३० वा. डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे पुणे, नाशिक, मुंबई व महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांसह एकत्रित मुंबईच्या दिशेने रवाना. सकाळी ९ वा. चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी १० वा. गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व सर्व शिवभक्तांसह शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी अरबी समुद्रात बोटीने रवाना होणार आहे.
शिवस्मारक शोध मोहिमेचा रॅली मार्ग असा असणार आहे. स्वराज्य भवन, पुणे – विद्यापीठ चौक – मुकाई चौक, रावेत, एक्स्प्रेसवे मार्गे लोणावळा – नवी मुंबई – चेंबूर – इस्टर्न फ्री वे मार्गे मुंबई – गेट वे ऑफ इंडिया.
LIVE : छत्रपती संभाजीराजे
स्वराज्य भवन, पुणे येथून मुंबईच्या दिशेने रवाना
स्वराज्य भवन, पुणे येथून मुंबईच्या दिशेने रवाना
अधिक माहिती देताना छत्रपती संभाजी यांनी सांगितले, मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. मिहणून ‘चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला’ ही मोहिम सुरू केली आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा