पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
येथील विजयी संकल्प मेळाव्यात शरदचंद्र पवार यांनी केलेले मार्गदर्शनाचे भाषण.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील, ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले ते पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील, ज्यांना देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही विजयी केलं ते डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि एकेकाळचे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री माधवराव किन्हाळकर, बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार रोहित पवार, महेबुब शेख, तुषार कामठे, अजित गव्हाणे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे उपस्थित असलेले सगळे नेते आणि उपस्थित बंधू- भगिनींनो..!
आजचा कार्यक्रम हा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. पुणे जिल्ह्यातील एक सहकारी आणि नांदेडचे सहकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या सगळ्यांचे स्वागत पक्षाचे अध्यक्ष जयंतराव यांनी केले. श्री. अजित गव्हाणे व त्यांचे सर्व सहकारी, नगरसेवक, कार्यकर्ते या सगळ्यांचे मी अंतःकरणापासून पक्षात स्वागत करतो. त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावर पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढेल कशी? याची खबरदारी आपण घेतली.
मी सहज आठवत होतो की, हा सगळा परिसर आणि त्याचा इतिहास..! एकेकाळी पिंपरी- चिंचवड म्हणजे छोटी- छोटी गावे होती, त्या गावात शेतीचा व्यवसाय होता. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक वेगळा विचार केला. त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नगरी होती, कापडाच्या गिरण्या मुंबईत होत्या, छोटे मोठे उद्योग मुंबईत होते. पण ही उद्योगांची मालिका मुंबईच्या बाहेर न्यावी, हा विचार यशवंतराव चव्हाण यांच्या मनात होता. त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक ऑटोमोबाईलचा कारखाना काढण्याचा विचार टाटांनी जमशेदपूरला केला. त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः जे. आर. डी. टाटांकडे गेले आणि त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमशेदपूरला करण्याऐवजी पुण्याच्या जवळ घ्या, मी तुम्हाला जागा देतो. टाटांनी मान्य केलं, त्यांचे अधिकारी आले जागा पाहिली राज्य सरकारने जागा दिली. एक कारखाना उभा राहिला आणि शेकडो छोटे-मोठे कारखाने या ठिकाणी उभे राहिले. दुसरी विनंती यशवंतरावांनी केली होती कमलनयन बजाज यांना. कमलनयन बजाज वर्ध्याचे आणि ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये जावं ही त्यांची इच्छा होती. चव्हाणसाहेबांनी त्यांना विनंती केली आणि आज बजाज ऑटो, बजाज टेम्पो हे कारखाने या ठिकाणी उभे राहिले. नंतरच्या काळामध्ये राहुल बजाज यांच्यासारखा एक कर्तृत्ववान त्यांच्या कुटुंबातील घटक यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आली आणि त्यांनी या भागात औद्योगिक क्रांती करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केली, हा इतिहास आहे इथला.
पिंपरी हे नाव देशामध्ये गेलं ते फॅक्ट्रीने. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल. महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी पडल्या. त्या आजारी पडल्यानंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं, गांधीजी त्यांच्याबरोबर राहिले. त्यावेळेला सुचवलं गेलं की कस्तुरबाची तब्येत जर सुधारायची असेल तर अधिक काळजी घेतली पाहिजे. ती काळजी घेण्याचा सल्ला गांधीजींनी दिला आणि तो सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधींनी मांडली. ते नवीन औषध म्हणजे फेनेसलीन. पिंपरीच्या फेनेसलीनचा निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधीजींनी दिला आणि त्या काळामध्ये फेनेसलीनची फॅक्ट्री हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ही या ठिकाणी निघाली आणि कर्वेकर नावाचे एक वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी या कारखान्याची उभारणी केली. या सगळ्या गोष्टींचा परिणाम पिंपरी- चिंचवड ही औद्योगिक नगरी झाली. आज ही महत्त्वाची औद्योगिक नगरी आहे, हजारो लोकांना काम मिळालं. आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाढली, ऑटोमोबाईल वाढलं, अधिक हातांना काम मिळालं पण नवीन पिढी जी शिक्षित आहे ती आयटीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काढली पाहिजे आणि त्यासाठी हिंजवडीला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला, आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करत आहेत.
एवढंच नाही तर ही कारखानदारी चाकणला नेली. ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली, ही कारखानदारी शिरवळला नेली आणि त्यामुळे हजारो लोकांना काम मिळालेलं आहे. हे सगळं होऊ शकलं एक विचार घेऊन पुढे चालत असताना तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली त्यामुळेच. मला आनंद आहे की हे चित्र बदलतंय. पण त्यासाठी अनेकांनी आम्हाला साथ दिली, अनेक लोक आज हयात नाहीत पण त्यांची नावे मला आठवत आहेत. अण्णासाहेब मगर, डॉ. घारे नावाचे नगराध्यक्ष, विठोबा लांडे, नानासाहेब शितोळे, हिरामण अशी अनेकांची नावे घेता येतील. या सगळ्या लोकांनी मामासाहेब पिंपळे असो, प्रभाकर साठे असो, भिकू शेठ असो, काटे असो, दिगंबर शेठ असो असे अनेक कर्तृत्ववान लोक या भागामध्ये होते. शेती करणारे होते, उद्योग करणारे होते. हे सबंध पिंपरीचे चित्र बदलण्यासाठी त्यांनी फार कष्ट केले आणि त्यामुळे ही नगरी उभी राहू शकली. माझी आपल्या सर्वांना विनंती ही आहे की ही प्रगती थांबवायची नाही. नवीन नवीन जे आणता येईल ते इथे आणायचं, याच्या बाहेर सुद्धा जायचं. महाराष्ट्र उद्योग धंद्याचं अत्यंत महत्त्वाचं शहर कसं होईल? हा विभाग कसा येईल? याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की, देशामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळा परिसर एक नवीन दिशा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आपण कायम ठेवून काम करू आणि इतिहास घडवू.