सानकथा | अपर्णा अनिल पुराणिक
आ’गळा वे’गळा गळा
story saver शिंप्याने ब्लाऊजचा गळा चूकून मोठा कापला. आता काय करावं ?
गिर्हाइकाला ते पण बाईला सामोरे कसं जायचं?
शिलाई तर बुडालीच, उलट कापडाचे पैसे भरुन द्यावे लागणार.
बाजारात जाऊन सेम टू सेम कापडही नाही मिळणार, कारण WBP (With Blouse Piece) साडीतलं कापड. झाले नाही होणारही नाही, या सम हेच !
बरं यावर कळस म्हणजे फोन आल्यावर आपणच सांगितल होत, हो झालय न संध्याकाळी देतो.
आलिया भोगासी असावे सादर, असं म्हणून
शिंपी ब्लाऊज व त्यात उरलेले कापडाचे तुकडे गुंडाळून ठेवू लागला. तेंव्हा त्याच्या हातात जरीकाठ आला. तो पाहून त्याला एक मस्त आयडियाची कल्पना सुचली. ताबडतोब त्याने कापडाची गुंडाळी सोडली. मशीन चालू केली. जरीकाठ हातात घेतला. ब्लाऊजच्या गळ्याला असा काही कलात्मक रीतीने जोडला की यंव रे यंव. इस्त्री करून ब्लाऊज रेडी करुन ठेवलं.
संध्याकाळी बाई आल्या ब्लाऊज बघून म्हणाल्या, किती सुंदर शिवलाय.
आश्चर्याने शिंपी, आवडला न तुम्हाला. बसा न ताई चहा मागवतो.
नको, चहा नको लगेच निघायचं. लग्नाला जायचंय ना. हॉलमधे माझं एकटीच ब्लाऊज इतक झक्कास असेल. आवडल का काय विचारता. खूप खूप आवडल. thank हं. असं म्हणून बाईंनी शिलाईचे पैसे दिले आणि म्हणाल्या, मोजून घ्या हं
अहो ताई तुम्ही २० ₹ जास्त दिलेत चुकून, शिंपी
चुकून मुळीच नाही बरं का. २० ₹ पॅटर्नचे म्हणून जास्त दिले.
मी पण तुझ्या टेलरकडे ब्लाऊज देते न शिवायला. कित्ती ग छान शिवतो. असं म्हणत बाईंसोबत मैत्रीण आली होती. तिने शिंप्याच्या हातात ब्लाऊज पीस आणि मापाच ब्लाऊज देत म्हटलं, अगदी अशाच फॅशनचा गळा शिवा हं.
हो हो आधी मोठ्ठा गळा कापतो मग काठ लावतो, शिंपी.
दोघी निघून गेल्या.
शिंपी घोटभर पाणी पिऊन कॅलेंडरवरच्या दुर्गादेवीच्या फोटोकडे पाहून नमस्कार करीत म्हणाला, आई, माते इतके दिवस वाटत होत उगीच लेडीजटेलर झालो. कटकट नुसती. पण आज वाटत की, बरं झाल लेडीज टेलर झालो ते. ‘शिंप्याची चूक म्हणजे फॅशन असते’ याची प्रचीती आली आणि ती चूक बघून महामाया प्रसन्न झाली. Gents Tailor झालो असतो तर दोन तीन कानाखाली मिळाल्या असत्या आणि पैसे भरून द्यावे लागलेच असते. शिवाय शर्ट थोबाडावर फेकला गेला असता ते वेगळच. असं म्हणत शिंप्याने दुकान बंद केलं. हलवायाकडून पेढे विकत घेतले. देवीच्या देवळात जाऊन देवीपुढे ठेवले. प्रसाद घेऊन घरी गेला.
दुसर्या दिवशी दुकान बंद असण्याचा दिवस होता.
तिसर्या दिवशी दुकान उघडत असतांना परवाच्या बाई आणि त्यांच्या नणंदा, भावजया, मैत्रीणी आल्या होत्या. एकेकीचे २-२, ३-३ ब्लाऊज शिवायला घेऊन.
“अगदी बरोब्बर मापाप्रमाणे शीवा हं पण गळा तेवढा आधी मोठ्ठा कापा. मग काठ लावा. राहील न लक्षात. ” मैत्रीण.
हो तर राहील लक्षात राहीलच, शिंपी.
मग सांगा बर कसं शिवाल ते.
“आधी मोठ्ठा गळा कापतो मग जरीकाठ लावतो.” उत्तर देत शिंप्याने आवंढा गिळला.
तुम्हाला सांगते पुढे शिंप्याने हजारो मोठे गळे कापले. जरीकाठ लावायला कारागीर ठेवले. जीन्याखालच्या Ladies Tailor अशी पाटी असलेल्या दुकानाचा जीना दुकानात गेला. दुकान दुमजली झालं. दुकानावर पाटी झळकली.
वस्त्रकला
आ’गळा वे’गळा गळा
तिसर्या मजल्यावर अर्थातच सरांचं अलिशान घर. चुकतो तो माणूस, पण चूक दुरुस्त करतांना घडतो तो कलाकार, कारागीर.
ही एका चुकीची कहाणी कलाकारी सुफळ संपुर्ण.
(लेखिका या १९७३ पासून अष्टांगयोग शिक्षका हठयोगिना असून आयुष मंत्रालय योगशिक्षका आहेत)