पाथर्डी | राजेंद्र देवढे
केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे राज्यातही पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. शेवगाव व पाथर्डी तालुके माझ्यासाठी समान असून मतदारसंघातील विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा. असे आवाहन MLA मोनिका राजळे यांनी केले.
तालुक्यातील सुसरे येथे कोट्यावधी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, उपसभापती कुंडलिक आव्हाड, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संदिप पठाडे, शेषराव कचरे, नारायण पालवे, भगवान साठे, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, श्रीकांत मिसाळ, दादासाहेब कंठाळी, बबन उदागे, वैशाली कंठाळी, जयश्री उदागे, सदशिव कंठाळी, अमोल नलावडे, राधाकिसन कंठाळी, पाराजी भेंडेंकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत बडे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मदत व सहाय्यता शिबीराचे आयोजन व आमदार मोनिका राजळे यांची पेढेतुला करण्यात आली.
पुढे बोलतांना आमदार राजळे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघात विविध विकासकामांच्या माध्यमातून आपण जनतेच्या संपर्कात आहोत. मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी दोन्ही तालुके व दोनशेपेक्षा जास्त गावे मला समान असून प्रत्येक तालुक्याला व प्रत्येक गावाला समान निधी व समान कामे दिली. कोणालाही झुकते माप देवून कोणावरही अन्याय केला नाही. प्रत्येक गावाचे समाधान करणे ही खूप मोठी कसरत असते. तरीही गेल्या दहा वर्षांत प्रत्येक गावात किमान दोन चार कामे केली. जनतेच्या वैयक्तिक सुख- दुःखाच्या प्रसंगी नेहमीच सहभागी आहोत. त्यामुळे
आपल्याला निवडणुकीसाठी वेगळी टॅगलाईन वापरून प्रचाराचा दिखावा करण्याची गरज नाही. कायम विकासाचा प्रयत्न, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दहा २०१४ पासून आपण कायम जनतेच्या संपर्कात आहोत. लोकसभेला झालेली चूक आपल्याला आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परडवणारी नसल्यामुळे पुन्हा त्या चुकीची पुनरावृत्ती व्हायला नको.
विरोधकांनी आता आपल्या हक्काचा माणूस शेवगावचा की पाथर्डीचा, असा Politisc प्रचार करून जनतेची दिशाभूल चालविली आहे. मला शेवगाव व पाथर्डी दोन्ही तालुके समान आहेत. एक रुपयात पाथर्डी तालुक्यासाठी ७५ कोटी पीक विमा तर शेवगाव तालुक्यासाठी ९ कोटी पीक विमा मंजुर झाला आहे. शेवगाव तालुक्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी राज्य पातळीवर प्रयत्नशील असून ती लवकर दूर होईल. गेली दहा वर्षे विरोधक कुठेच नव्हते. आता निवडणुका जवळ आल्याने त्यांना जनतेची आठवण झाली आहे. आता चार महिने अनेक इच्छुक बाहेर पडतील कोणी शिवार फेरी, कोणी परिवर्तन यात्रा तर अजून काही तिसरे लोक वेगळाच काहीतरी प्रचार करून तुमची दिशाभुल करतील. परंतु, केंद्रात आपली सत्ता असल्याने राज्याला मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी मिळत आहे. त्यामुळे राज्यातही महायुतीचे सरकार येणार आहे. आपण सर्वांनी भाजपा व महायुती उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहून मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवावे असे आवाहन आ.राजळे यांनी केले.
यावेळी डॉ. मृत्युंजय गर्जे व बबनराव उदागे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बळीराम कंठाळी यांनी सूत्रसंचालन केले तर केशव पवार यांनी आभार प्रदर्शन केले.