भिवंडी | गुरुदत्त वाकदेकर
१९६३ साली स्थापन झालेल्या व ६१ वर्षांची सामाजिक सेवेची प्रदीर्घ व दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या लायन्स क्लब ऑफ भिवंडी या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या सन २०२४-२५ वर्षासाठी अध्यक्षपदी लायन जयश्री प्रमोद पाटील यांची सर्वानुमते विशेष कार्यक्रमात निवड करण्यात आली.
पास्ट मल्टीपल कौन्सिल चेअरमन लायन हनुमान अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका भव्यदिव्य आणि सुनियोजित कार्यक्रमात मावळते अध्यक्ष लायन सुधीर देशमुख यांच्याकडून रितसर पदभार स्विकारण्यात आला.
पदग्रहण सोहळा माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन कमलकिशोर हेडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशिर्वादाने पार पडला. सचिव लायन शितल देशमुख, खजिनदार लायन सुमीत अगरवाल, उपाध्यक्ष भालचंद्र कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. पदग्रहण सोहळ्यात लायन्स क्लबचे बहुसंख्य नवे-जुने सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अनेक हितचिंतक, आप्तेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वांनी लायन जयश्री प्रमोद पाटील यांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष लायन सुधीर देशमुख यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. लायन कमलकिशोर हेडा यांनी लायन्स क्लबचा पूर्व इतिहास आणि आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष लायन जयश्री प्रमोद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांचे आभार मानले आणि सर्वांच्या सहकार्याने वर्षभरात उत्तमोत्तम उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.
लायन चेतन बदीयानी यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली तर सचिन लायन शितल देशमुख यांनी आभारप्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली. दादासाहेब दांडेकर विद्यालय भिवंडी येथे संपन्न झालेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादासाहेब दांडेकर विद्यालयाचे कर्मचारी तथा सर्व लायन्स क्लब सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.