अहमदनगर | प्रतिनिधी | २९
शहर परिसरात एनजीओसह फिल्म डिरेक्टर व ॲक्टर असल्याची बतावणी करणारा ‘हेल्पींग हँड’चा अध्यक्ष तसेच तथाकथित पत्रकारीता करणारा भैय्या बॉक्सर उर्फ इस्माईल दर्यानी यास भाजपाचे माजी आमदार भिमराव धोंडे यांना हनीट्रॅपच्या उद्देशाने ब्लॅकमेल करण्याच्या गुन्ह्याखाली कोतवाली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यातील काही कारनामे त्याने स्टेटबँक चौकातील ‘रॉयल’मधे केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल करू, बलात्काराचा गुन्हा दाखल करू, तुमची राजकीय कारकीर्द खराब करू, अशी धमकी देत दोन महिला आणि एका यू ट्यूब चॅनलच्या भैय्या बॉक्सर या पत्रकाराने आष्टीचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे (वय ६९, रा. आष्टी) यांना १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. सहकारी महिला आणि बॉक्सरच्या त्रासाला कंटाळून शेवटी धोंडे यांनी अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी इस्माईल दर्यानी उर्फ भय्या बॉक्सर याच्यासह दोन महिलांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील भय्या बॉक्सर याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे धोंडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. मधल्या काळात बॉक्सरने धोंडे यांच्या पीएकडून पंचवीस हजार रुपये वसूललेही होते. तरीही त्रास सुरूच राहिल्याने शेवटी त्यांनी फिर्याद दाखल करण्याच निर्णय घेतला.
त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी आपल्याला वेळोवेळी धमकी दिली की, तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती व्हायरल करायचे नसेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील. अन्यथा तुमच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करू. तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी दिली. तब्बल सहा महिने हा प्रकार सुरू होता. आरोपी त्यांच्याकडे असलेली कथित व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत होते.
असले प्रकार यापूर्वीही अनेक घडले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनांवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.