मुंबई | प्रतिनिधी | २२.६.२०२४
मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी इतिहासावर आधारित ‘मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’च्या पुढाकाराने संकलित करण्यात आलेल्या ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे पार पडले.
नामवंत इतिहासकार, लेखक, संशोधक, वास्तुरचनाकार यांनी लिहिलेल्या १८ प्रकरणांचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशावेळी देशातील बंदरांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे भारतातील विविध बंदरे आणि गोदी यांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरेल, असे राज्यपाल रमेश बैस यावेळी म्हणाले.