बारामती (प्रतिनिधी) १८.६.२०२४
खरं म्हटलं तर देशाची लोकसभेची निवडणूक झाली. यंदाच्या वर्षी पक्षाच्या वतीने फक्त दहाच ठिकाणी निवडणुका लढवण्याचा निकाल घेतला. महाराष्ट्राच्या जनतेने दहा पैकी आठ ठिकाणी दिलेल्या उमेदवारांना निवडून दिलं आणि सबंध देशामध्ये एक संदेश पसरवला की, महाराष्ट्राच वातावरण बदलतोय, असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काढले. बारामतीमधील निंबूत येथे शेतकरी जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आता महाराष्ट्राची सत्ता भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे. पण मला खात्री होती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरल्यानंतर, लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर या निवडणुकीचे निकाल वेगळा लागेल हे स्पष्ट दिसत होते. महाराष्ट्रामध्ये ४८ जागा लोकसभेच्या आहेत त्यापैकी ३१ ठिकाणी आजच्या सत्तेवर जे लोक आहेत त्यांचा पराभव झाला आणि ३१ ठिकाणी आम्हा लोकांना यश आलं. याने सबंध देशामध्ये एक संदेश गेला. हा निकाल तुम्ही लोकांनी केला आणि तुमचा निकाल अनुकूल असल्यानंतर आम्हा लोकांची जबाबदारी आहे की, अनेक अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आत्ताच साखर कारखान्याच्या उसाचा प्रश्न सांगितला, पाण्याचे प्रश्न आहेत. गेले पाच-सहा दिवस पाऊस होता म्हणून ठीक आहे पण तसंही सबंध राज्यामध्ये अद्याप धरणांची स्थिती सुधारलेली नाही. या सगळ्यातून मार्ग काढावा लागेल आणि मिळालेल्या सत्तेचा वापर लोकांचं दुखणं कमी करण्यासाठी आम्हा लोकांचा प्रयत्न हा राहील.
याआधी मी सांगितलं की, बऱ्याच वर्षांनंतर मी निंबुत येथे आलो. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक वर्षे हिंडतोय पण इथे कधी आलो नव्हतो, त्याच्या खोलामध्ये जायची माझी इच्छा नाही. जे घडलं जुन्या काळात ते विसरून जायचं, नव्या विचाराने जायचं. बाळासाहेब आणि आमचे जुने सहकारी या ठिकाणी होते. त्यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये साथ कधी सोडली नाही हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे साहजिकच राजकारणात कमी जास्त होत असतं. पण सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एकदा एकत्र येणं आणि नव्या उमेदीने नव्या पिढीला बरोबर घेऊन कामाला लागणं याच्यामध्येच खऱ्या अर्थाने लोकांचं कल्याण आहे आणि त्याच दृष्टीने जायचा निकाल मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा राहील एवढीच खात्री या ठिकाणी बाळगतो.
काही प्रश्न आहेत त्याची काही सविस्तर माहिती माझ्याकडे नाही. पण सतीश मामा या ठिकाणी आहेत, तालुक्याचे अध्यक्ष एस एन जगताप या ठिकाणी आहेत, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सातव साहेब या ठिकाणी आहेत. काही विकासाचे प्रश्न असतील त्यासंबंधीची माहिती तुम्ही यांच्याकडे दिली आज ना उद्या कधीही मी आणि ज्यांना खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलं त्या सुप्रियाताई आणि बाकीचे सगळे सहकारी आम्ही त्याच्यात लक्ष घालू, तिथे कुठलाही राजकारण येऊ देणार नाही. विकासाचे धोरण फक्त नजरेसमोर ठेवून आणि नव्या उमेदीने आपण सर्वजण कामाला लागू एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही सगळ्यांनी आम्हा सगळ्यांचं या ठिकाणी अंतःकरणापासून स्वागत केलं त्या सगळ्या नागरिकांचं बंधू-भगिनींच मी अंत:करणापासून आभार मानतो, असे पवार यावेळी म्हणाले.