अंकुश चौधरी घेऊन येत आहे 'तोडी मिल फॅन्टसी'; २२ जूनला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात - Rayat Samachar
Ad image

अंकुश चौधरी घेऊन येत आहे ‘तोडी मिल फॅन्टसी’; २२ जूनला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १७.६.२०२४
मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार अंकुश चौधरी गिरणगावातील भूमिपुत्रांची गोष्ट असलेल्या Theatre Flamingo यांच्या ‘तोडी मिल फँटसी’ नाटकाला घेऊन रंगमंचावर येत आहे. २२ जून २०२४ रोजी राणीबाग भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा प्रयोग आयोजित केलेला आहे.
याबाबत माहिती देताना चौधरी यांनी सांगितले की, गेली पन्नास वर्ष या मुंबई शहरात राहतोय. या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारं हे शहर रोज पाहतोय. याच शहरातल्या गिरणगावात लहानाचा मोठा झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, कॉटर, दोस्ती, यारी, थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी. सांगायची गोष्ट ही की हे शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मराठी माणसांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताच पाणी करून हे शहर उभ केलं, त्या कामगारांचं अस्तित्वच हे शहर नाकारू लागलंय. या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच.
ते पुढे म्हणाले, एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार ‘तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. २२ जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह. सायंकाळी ४:०० वा. राणीबाग भायखळा येथे. या आपल्या शहराची, आपल्या गिरणगावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. माझी खात्री आहे, या प्रयत्नात तुम्ही नक्की साथ द्याल.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

तिकीट बुकिंगसाठी लिंकवर क्लिक करा
https://www.ticketalay.com/event-details/-todi-mill-fantasy/104

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

तोडी मिल फॅन्टसी विषयी माहिती देताना संजय पाटील म्हणाले, आजकाल मराठी माणूस संघर्ष करून इकडून तिकडून पैसे जमा करून मुंबईत घर घेतो. आपल्या नातेवाईकांना आनंदाने घरी बोलावतो. पण त्याची मुंबई आता बदलापूर किंवा टिटवाळा मधल्या एका गावात जाऊन थांबलीय. आणखी काही वर्षांनी ती खोपोलीच्या पुढे जाईल. दर काही दिवसांनी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्याच्या किंवा अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या बातम्या येतात. सव्वा कोटीच्या वर लोकसंख्येच्या या महानगरात अशा अनेक घटना घडत असतील परंतु अनेक जण समोर येत सुद्धा नसतील. मराठी माणूस काय कोणताही सामान्य माणूस मुंबईत आपला संसार सहजपणे उभा करू शकत नाही. गेल्या साठ वर्षात असं काय झालं? गिरणी मालकांनी गिरणी कामगारांच्या घामातून कमावलेला नफा इतर क्षेत्रात गुंतवला, संप झाला, हळूहळू गिरण्या बंद पडल्या, गिरण्यांच्या नूतनीकरणाच्या नावाखाली गिरणी मालकांनी सरकारला हाताशी धरून नियमांची मोडतोड करत त्या जागा विकायला काढल्या, आता त्या जागी टोलेजंग इमारती आणि चकचकीत मॉल उभे आहेत. गिरणी कामगार मात्र आपली देणी कधी मिळतील आणि म्हाडाची लॉटरी कधी निघेल याची वाट बघत बसला. मुंबईची स्कायलाईन बदलली परंतु मराठी माणूस मात्र हळूहळू या मायानगरीच्या बाहेर फेकला गेला. जेवढं सरकार दोषी, तेवढाच मराठी माणूसही यासाठी दोषी आहे. त्याच्या अस्मितेचं आणि आकांक्षाचं काय झालं? घर देता का घर – अशी वेळ त्याच्यावर का आली? मराठी तरुण कुठे आहे आणि काय करतोय, मराठी मतांच्या जीवावर निवडून आलेले राजकारणी काय करतायत? मुंबईतील मराठी शाळा का बंद पडल्या, मराठी चित्रपट आणि नाटकांना थिएटर मिळावं म्हणून आपल्याच राजधानीत कलाकारांना का संघर्ष करावा लागतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर एक अनोखं नाटक ‘तोडी मिल फॅन्टसी’ नक्की बघा.
मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही कलाकृती मुंबई येथे सादर होत आहे. तर आजच तिकीट बुक करा आणि आपल्या मित्रांनाही जरूर सांगा.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment