मुंबई | गुरूदत्त वाकदेकर
Acharya Atre Award: आचार्य अत्रे यांचे पत्रकारितेतील योगदान नव्या पिढीला समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर आधी आचार्य अत्रे समजून घेतले पाहिजेत. यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन आचार्य अत्रे अध्ययन केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी बुधवारी येथे केली.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रतिष्ठेचा २०२५ चा आचार्य अत्रे पुरस्कार या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पद्मभूषण राम सुतार यांच्याकडून स्वीकारल्यानंतर कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात २०२४ सालचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांच्यावतीने त्यांच्या कन्या अल्पना सोमाणी यांनी स्वीकारला.
सध्या महाराष्ट्रात मराठी भाषेसंदर्भात जे राजकारण सुरू आहे त्याबाबत सर्व पत्रकारांनी आवाज उठविला पाहिजे. महाराष्ट्रात दूरदर्शनवर मराठीचा अपमान सुरू होता त्यावेळी आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आंदोलन केले. त्यानंतर सह्याद्री वाहिनीवर मराठीला सन्मान मिळाला. तसे आंदोलन आता मराठीसाठी पुन्हा करण्याची वेळ आली आहे, असेही कदम म्हणाले.
आचार्य अत्रेंनी आमच्यातील पत्रकार घडवला अशा शब्दांत रमेश झवर यांनी या पुरस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे मनोगत त्यांच्या कन्या अल्पना यांनी वाचून दाखविले.
जगभरात उत्तुंग शिल्प घडविणारे शिल्पतपस्वी पद्मभूषण राम सुतार यांच्या हस्ते पत्रकारितेतील उत्तुंग कार्य करणार्या कुमार कदम आणि रमेश झवर यांचा सत्कार होतोय हा आम्हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे असे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले. कुमार कदम यांनी आता जे अवयवदान चळवळीचे कार्य हाती घेतले आहे, त्याला पत्रकार संघाचे पूर्ण सहकार्य असेल असा शब्द चव्हाण यांनी कदम यांना दिला, पण त्याचवेळी कदम यांनी त्यांचे पत्रकारितेतील अनुभव पुस्तक रुपाने जतन केले पाहिजेत, असा आग्रहही चव्हाण यांनी यावेळी धरला.
जगभरात मी अनेक सत्कार स्वीकारले, पण पत्रकार संघाने माझ्या कार्याची दखल घेऊन माझा सत्कार केला. मुंबई मराठी पत्रकार संघाने माझ्या कार्याची दखल घेतली याचे कौतुक जास्त आहे. आज ज्यांना आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन अशा शब्दात पद्मभूषण राम सुतार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सोहळ्याचे औचित्य साधून मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार राम सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ. द्वारकानाथ कोटणीस समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सोहळ्याचे प्रास्ताविक उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी केले. कोषाध्यक्ष जगदिश भोवड यांनी आभार मानले. यावेळी मंचावर विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, नवनियुक्त विश्वस्त अजय वैद्य, राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार उपस्थित होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.