पाथर्डी येथे ३० व्या राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
विशेष प्रतिनिधी | राजेंद्र देव्हडे | २२ डिसेंबर
Sports बुद्धिबळ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात तसेच बुद्धीत हमखास वाढ होते. संयम, सातत्य, एकाग्रता राखण्यात बुद्धिबळाची मदत होते व जीवनातील आव्हानांनाही सामोरे जाता येते. असे प्रतिपादन तहसीलदार उध्दव नाईक यांनी केले.
महाराष्ट्र सेवा मंडळ व आनंद चेस क्लब आयोजित ३० व्या राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. अभय आव्हाड, वैभव शेवाळे, डॉ विनय कुचेरिया, प्रा संजय ससाणे, डाॅ. शिरीष जोशी, आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे, राम पाथरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धेत पहिल्याच दिवशी २१० खेळाडूंचा सहभाग आहे. विशेषतः पुणे, बीड, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, कोपरगाव, लोणी, शेवगाव, सांगली आदी ठिकाणांहून आलेले स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तामिळनाडू राज्यातील तुतीकोरीन येथीलही एक स्पर्धक सहभागी झाला आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंपैकी ५० खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झालेले आहेत. यावर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे आहे की, सर्वात कमी वयाचा स्पर्धक ६ वर्षाचा आहे तर सर्वात वरिष्ठ स्पर्धक ८० वर्षाची व्यक्ती आहे. बाहेर गावच्या स्पर्धकांच्या निवासाची सोय केलेली आहे. स्पर्धेत १३०००० रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बुद्धिबळाच्या पटावरील एक प्यादे पुढे सरकावून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावर्षीची स्पर्धा अतिशय चुरशीची होईल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय मानांकन लाभलेले सागर गांधी हे काम पाहत आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदन कुचेरिया, कृष्णा शिरसाठ, गणेश भागवत, सुहास येळाई व सचिन कांबळे यांनी परिश्रम घेतले. डॉ. विनय कुचेरिया यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब गोरे यांनी सूत्रसंचालन केले तर संजय ससाणे यांनी आभार प्रदर्शन केले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी