उमरखेड |१२ नोव्हेंबर | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी आज हवालदिल झाला असून महिला आणि बालिका देखील सुरक्षित नाहीत. गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातला आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया उमरखेड Election विधानसभा मतदार संघांचे उमेदवार डॉ. प्रेम हनवते यांनी दिली. त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेऊन महाविकास आघाडीचे ८२ उमरखेड विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी ते म्हणाले, महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जातात. अनु.जाती, अनु. जमातीच्या विशेष घटक योजनेच्या रकमेवर सरकारने दरोडा घातला आहे. मागासवर्गीयांचा हा निधी पुरेपूर न वापरता तो इतर योजनांवर खर्च करून मागासवर्गीय समुदायाचा विश्वासघात महायुती सरकारने केलेला आहे.
फुले आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक डॉ. प्रेम हनवते यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण धर्मनिरपेक्ष आणि संविधानवादी मतांचे विभाजन होऊन धर्मांधशक्ती पुन्हा विजयी होऊ शकते. हा धोका ओळखून अर्ज मागे घेतला. महायुतीच्या सरकारने शेतकरी, शेतमजूर आणि मागासवर्गीय समाजाचा घात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी महाविकास आघाडीला खंबीर पाठींबा दिला आहे.