अहमदनगर | प्रतिनिधी
पद्मशाली जातीबांधवांचा बागुलूपंडुगू सण म्हणजेच बागेचा सण गेल्या कित्येक वर्षापासून आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेनंतर साजरा केला जातो. याही वर्षी हा सण सर्वांनी घरटी एक झाड लावून वृक्षारोपण करत त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेऊन साजरा करावा, असे आवाहन पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.
या महिन्यातील ता.२६ जुलै रोजी हा सण साजरा होत असून पद्मशाली समाजामधील बागुलू पंडूगू हा सण मोठ्या थाटातमाटात समाजातील सर्व घटक एकत्र येऊन अहमदनगर शहरातील बालिकाश्रम येथील मंदिरात, तोफखाना व सावेडी उपनगरातील श्रमिकनगर येथे साजरा केला जातो.
या दिवशी पदमशाली जातीबांधव देवीला साकडे घालून प्रार्थना करून निसर्गाचे रक्षण करण्याचे तसेच पर्जन्यवृष्टी ही संतुलित प्रमाणात होण्यासाठी व दुष्काळ अगर अतिवृष्टी होऊ नये यासाठी देवीला प्रार्थना केली जाते. या सणाला बागेचा सण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध असून राज्यात ज्या ठिकाणी पदमशाली लोक राहतात त्या ठिकाणी त्यांचे सोयीने हा सण साजरा केला जातो, अशी माहिती पद्मशाली पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.