नगर तालुका | प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. येथे परिसरातील ३१८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ते रोज शाळेत आले की वर्गात जाण्याआधी दारातच स्वागत होते ‘गु’टखा खाऊन पचापचा थुंकल्याच्या घाणीचे. ती ओलांडून विद्यार्थी वर्गात जातात आणि घाणेरड्या, घुमाट वासात दिवसभर ज्ञानग्रहण करतात. कमाल आहे की नाही लेकरांची ? पण याची लाज कोणालाच वाटत नाही !
गावातील बेरोजगार, टुकारफकार मंडळी शाळेच्या परिसरात वर्गांसमोर रात्रीबेरात्री गप्पागोष्टी करत बसत असतात. गप्पागोष्टींबद्दल कोणाचीच तक्रार नाही, परंतु त्याचबरोबर ही मंडळी ‘गु’टखा, तंबाखूबरोबर विडीसिगारेटचे झुरके मारीत शाळेचा परिसर घाण करत आहेत. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या शाळेत आपली लेकरं शिकतात, तिथेच घाण करणे योग्य नाही.
मुळात शाळापरिसरात १०० मिटर अंतरावर तंबाखुजन्य पदार्थ खाणे, विकणे गुन्हा आहे. याच कारणावरून शिक्षणतज्ञ मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर ‘गु’टखा तस्कर’कडून हल्ला करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते, गुन्हे दाखल झाले होते. तरीही हा घाणेरडा प्रकार सुरू असल्याने शेवटी विद्यार्थ्यांना गावातील सुज्ञ जाणत्या मंडळींना साद घालावी लागली आणि म्हणावे लागले, “हा गु’टखा खाणारांना कोणी तरी समझवा हो !”