अहमदनगर (प्रतिनिधी) २०.६.२०२४
आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी त्या क्षेत्रात, विषयात आपल्याला असलेले ज्ञान, लालसा, कुतूहूल व तळाशी जाऊन ज्ञान आत्मसात करण्यात व त्यासाठी सतत ‘विद्यार्थी’ बनून जो आनंद मिळतो, त्यातून आपण ‘किमयागार’ बनतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. ऐतिहस्सिक अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या सावेडी शाखेच्या मातोश्री यमुनाबाई त्र्यंबके देशमुख ग्रंथालय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी नूतन खासदार निलेश लंके, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, श्रीमती अंजली देशमुख, उद्योजक महेश देशमुख, राजू देशमुख, अभिजित कुलकर्णी, सावेडी विभागप्रमुख प्रा.ज्योती कुलकर्णी, प्रा.आर.जी.कुलकर्णी, नगरसेवक योगिराज गाडे, बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, भाजपाचे मिलिंद गंधे, संजय गारुडकर, अभियंते रविंद्र थिगळे, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, वैद्य राजा ठाकूर, शिल्पा रसाळ, किरण आगरवाल, राहुल तांबोळी, अजित रेखी, संजय चोपडा, डॉ.शैलेंद्र पाटणकर, उपाध्यक्ष अनंत देसाई, खजिनदार तन्वीर खान, प्रा.मेधा काळे, अनिल लोखंडे, कवी चंद्रकांत पालवे, गौरी जोशी, ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे अच्युत गोडबोले यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगात, आपण शालेय, महाविद्यालयीन व नोकरीच्या काळातही सतत विद्यार्थी बनून विषयाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला, त्यातून ज्ञान ग्रहण करतांना येणार्या गंमती-जंमती या आनंददायी ठरल्या व त्यानंतर लेखनाच्या माध्यमातून समाजातील अनेकांच्या जगण्याचा प्रेरणा ठरल्या. मी समाजात अनेक तळागाळातील लोकांमध्ये वास्तव्य करुन त्यांच्या जगण्याचा संघर्ष माझ्या प्रेरणा ठरल्या. जगातील अनेक व्यक्तींचे कार्य, कर्तुत्व, जिज्ञासा व संशोधन पाहिल्यावर मी जमिनीवर धाडकण पडलो. तेथून उठल्यावर जमिनीवर जे पाय आहेत तेच कायम आजही ठेवले व त्यातून अनेक विषय मी समाजासमोर आणू शकलो. पुढे बोलतांना त्यांनी आपण समाज काय म्हणतो हे बाजूला ठेवून माणूस म्हणून जगायला लागू. स्वत:साठी जगायला लागू तेव्हाच आपण खर्या अर्थाने आपले जीवन सार्थकी लागेल. अहमदनगर जिल्हा वाचनालयाने ग्रंथाच्या माध्यमातून जीवन जगण्याची खरी कला आत्मसात करणारी प्रवेशद्वारे उभी केली असल्याचे त्यांनी सांगितले. खा.निलेश लंके यांनी बोलतांना अहमदनगर जिल्हा वाचनालय व त्यांना दानशूरपणे मदत करणारे देशमुख सराफ आणि कुलकर्णी कुटूंबाचे कार्य अनेक पिढढ्यांना घडविणारे व प्रेरक असे आहे. लवकरच शासन व अहमदनगर वाचनालयाच्या माध्यमातून युवा वर्गाला घडविणारे स्पर्धा परिक्षा केंद्र व अभ्यासिका सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केले. प्रास्तविकात अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी आज जिल्हा वाचनालयाच्या इतिहासात ऐतिहासिक क्षण आहे. दहा वर्षापासून सावेडी वाचनालयाच्या स्वत:च्या वास्तूची असणारी प्रतिक्षा आज संपली. त्यासाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. देशमुख व कुलकर्णी परिवाराने यासाठी दिलेले योगदान वाचन संस्कृतिसाठी अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, असे सांगितले.
प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी आपल्या मनोगतात, अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या सावेडी शाखेच्या लोकार्पण सोहळा संपन्न होताना या माध्यमातून वाचकाची ज्ञान लालसा पूर्ण होणार आहे. भविष्यात ई-लायब्ररी, स्पर्धा परिक्षा केंद्र, बाल वाचनालय, असे अनेक लोकाभिमुख टप्पे असून, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. या सावेडी वाचनालय वास्तू उभारणीत देशमुख सराफ व कुलकर्णी परिवार यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार निलेश लंके व लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. मातोश्री यमुनबाई त्र्यंबक देशमुख ग्रंथालय व प्रा.आर.जी.कुलकर्णी सभागृहाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
मान्यवरांच्या हस्ते कुलकर्णी व देशमुख परिवाराचा सन्मान करण्यात आला. यावेळी वाचनालयाच्या नियोजित उपक्रमासाठी मदत करणारे उद्योजक किशोर मुनोत व साहित्यिक प्रा.लिलाताई गोविलकर यांचा सन्मान करण्यात आला. परिचय प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी करुन दिला तर सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी व आभार आरती कुलकर्णी यांनी मानले. यावेळी साहित्यिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.