भारतासह ११ संघ २०२६ च्या विश्वचषकासाठी ठरले पात्र, अमेरिकेचाही यादीत समावेश - Rayat Samachar

भारतासह ११ संघ २०२६ च्या विश्वचषकासाठी ठरले पात्र, अमेरिकेचाही यादीत समावेश

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १९.६.२०२४

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सूरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचा गट टप्पा संपला असून अव्वल आठ संघ सुपर-८ टप्प्यामध्ये पोहोचले आहेत. सध्याचा विश्वचषक अजून संपलेला नाही, पण २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी संघांची निवडही निश्चित झाली आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या या जागतिक स्पर्धेसाठी एकूण १२ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे.

दोन वर्षांनी होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे सोपवण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी चांगली राहिली नाही आणि संघाला ग्रुप स्टेजच्या पलीकडे प्रगती करता आली नाही, पण यजमान असल्याने ते पात्र ठरले आहेत. दुसरीकडे, टी२० विश्वचषकाच्या गट टप्प्यात भारताची कामगिरी चांगली होती आणि संघाने अव्वल स्थान पटकावून सुपर-८मध्ये प्रवेश मिळवला. तथापि, यजमान असल्याने भारत २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

अमेरिका आणि अफगाणिस्तानचे संघही थेट पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही संघांनी सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. अफगाणिस्तान आणि अमेरिका सुपर-८मध्ये प्रवेश करून २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. सुपर-८मध्ये पोहोचून ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघही पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

अमेरिका आणि अफगाणिस्तान सारख्या संघांनी त्यांच्या कामगिरीच्या जोरावर २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले, तर न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या संघांनी टी२० क्रमवारीच्या आधारे २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत स्थान निश्चित केले. सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती आणि दोन्ही संघ सुपर-८ टप्प्यासाठी पात्र ठरू शकले नाहीत. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने आपापल्या गटात चार सामने खेळले, त्यापैकी दोन त्यांनी जिंकले, तर दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचा प्रवास गट टप्प्यातच संपुष्टात आला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडशिवाय आयर्लंडचा संघही क्रमवारीच्या आधारावर पात्र ठरण्यात यशस्वी ठरला.

२०२६ च्या टी२० विश्वचषकात यावेळेसही २० संघ सहभागी होतील आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा दोन देशांमध्ये आयोजित केली जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ संघांची निवड करण्यात आली आहे, परंतु उर्वरित आठ संघ विभागीय पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत प्रवेश करतील.

Share This Article
Leave a comment