Samvidhan Jagar Mahotsav: संविधान दिनानिमित्त गुरुवारी संविधान जागर महोत्सवाचे आयोजन; माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजेंद्र धामणे यांची स्वागताध्यक्षपदी निवड - Rayat Samachar

Samvidhan jagar mahotsav: संविधान दिनानिमित्त गुरुवारी संविधान जागर महोत्सवाचे आयोजन; माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजेंद्र धामणे यांची स्वागताध्यक्षपदी निवड

rayatsamachar
3 Min Read
Subeditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | २३.११ | रयत समाचार 

Samvidhan jagar mahotsav: संविधान दिनानिमित्त गुरुवार, ता. २६ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगरमध्ये संविधान जागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मानवाधिकार अभियान, सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था आणि सहायक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्ह्यातील समविचारी संस्था, संघटना, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

या महोत्सवाच्या नियोजनासाठी नुकतीच संविधान जागर महोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे यांची महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

डॉ. राजेंद्र धामणे गेल्या तीन दशकांपासून लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. निराधार, बेघर तसेच मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिला व मुलांना निवारा, उपचार आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘मनगाव’ या स्वयंपूर्ण गावाची निर्मिती केली आहे. सामाजिक कार्यासोबतच लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून, त्यांनी अनेक लघुपट व माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या काही कलाकृतींची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झाली आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, अशोक सब्बन, डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. प्रदीप जारे, सॅम्यूएल वाघमारे, भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.

यंदा संविधान जागर महोत्सवाचे नववे वर्ष असून, संविधान दिन ते १० डिसेंबर मानवाधिकार दिन या कालावधीत संविधान जागर पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत संविधान जागर रथ, पथनाट्य, संविधान गीते, प्रबोधनपर व्याख्याने, चर्चासत्रे आणि शासकीय योजनांची प्रचार-प्रसिद्धी असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभागाचे प्रवीण कोरगंटीवार यांनी दिली.

गुरुवार, ता. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत संविधान जागर महोत्सवांतर्गत शहरातून भव्य संविधान जागर रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ही रॅली सीएसआरडी महाविद्यालयात पोहोचणार आहे. तेथे संविधान जागर सभेने रॅलीचा समारोप होईल. या सभेत संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांचे व्याख्यान होणार आहे.

संविधानातील मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या महोत्सवात जिल्ह्यातील संस्था, संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी केले आहे.

संपर्क : ॲड. संतोष गायकवाड – ९०२८५१००२४, संध्याताई मेढे – ७७०९९८५५५५, सॅम्यूएल वाघमारे – ८७८८४१२७८०, भैरवनाथ वाकळे – ९४०५४०१८००

हे हि वाचा :   सावित्रीबाईंच्या शैक्षणिक वारशाची शाळा वाचवा! सिंथिया फॅरार ते क्लेरा ब्रुस : अहिल्यानगरच्या ऐतिहासिक मुलींच्या शाळेचे भवितव्य काय? ऐतिहासिक शाळेला ‘आदर्श मॉडेल स्कूल’ चा दर्जा द्या

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading