रयत समाचार
अहिल्यानगर | ३१.१० | भैरवनाथ वाकळे
(Cynthia Farrar Grave) भारतातील स्त्रीशिक्षणाचा इतिहास लिहिताना माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या योगदानाचे महत्त्व प्राधान्याने समोर येते. सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, त्यांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे आणि सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे यासाठी फुले दाम्पत्याने केलेला संघर्ष भारताच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा अध्याय. सुरूवातीला सावित्रीबाईंच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि महात्मा फुले यांच्या स्त्रीशिक्षणविषयक विचारांना दिशा देण्यात ऐतिहासिक अहमदनगर तथा विद्यमान अहिल्यानगरमधील अमेरिकन महिलेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांचे नाव आहे मिस् सिंथिया फॅरार (Miss Cynthia Farrar).
(Cynthia Farrar Grave) धर्मकार्याबरोबरच स्त्रीशिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सिंथिया फॅरार या अमेरिकन मिशनरी, शिक्षिका आणि शिक्षणप्रसारक होत्या. सावित्रीबाईंच्या शिक्षक प्रशिक्षणाशी त्यांचा ऋणानुबंध कायमचा जोडला गेलेला आहे. महात्मा फुले यांनीही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख आपल्या लेखनात केलेला दिसून येतो. विशेष म्हणजे, या महान शिक्षणसेविकेची कर्मभूमी अहमदनगर तथा विद्यमान अहिल्यानगर होती. याच शहरात २५ जानेवारी १८६२ रोजी त्यांचे निधन झाले. याच भूमीत त्यांना दफन करण्यात आले.
(Cynthia Farrar Grave) आजवर स्त्रीशिक्षण इतिहासाच्या पानांमध्ये तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला त्यांच्या कबरीच्या शोधामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणण्याची संधी आम्हाला मिळाली.
अमेरिकेत जन्म, भारतात शिक्षणकार्य : मिस् सिंथिया फॅरार यांचा जन्म २० एप्रिल १७९५ रोजी अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर राज्यातील मार्लबरो येथे झाला. नुकताच त्यांची जन्मनोंद दाखला अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाला प्राप्त झाला. अमेरिकन मराठी मिशन संबंधित पहिल्या अविवाहित महिला मिशनरी म्हणून त्यांचा महत्त्वपुर्ण उल्लेख आढळतो.
एकोणिसाव्या शतकात भारतात येऊन शिक्षण आणि सामाजिक कार्य करणे हे महिलांसाठी मोठे आव्हान होते. अशा काळात फॅरार यांनी भारतात येऊन मुलींच्या शिक्षणासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. २९ डिसेंबर १८२७ रोजी त्यांचे मुंबईत आगमन झाले. अमेरिकन मराठी मिशनच्या कार्यात सहभागी झाल्यानंतर त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले. सुरुवातीला मुंबईत त्यांनी काम केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे १८३७ मध्ये त्या अमेरिकेत परतल्या. मात्र १८३९ मध्ये पुन्हा भारतात आल्या आणि त्यानंतर अहमदनगरला आपली कर्मभूमी ठरविली.
मुंबईत मुलींच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला : सिंथिया फॅरार भारतात आल्या त्याकाळात मुलींना शिक्षण देण्याबाबत समाजातील काही अपप्रवृत्तींचा मोठा विरोध होता. मुलींनी शिकण्याची गरज नाही, त्यांचे आयुष्य घरकाम आणि बालविवाहापुरते मर्यादित असावे, अशी चुकीची सामाजिक धारणा प्रचलित करण्यात आली होती. धर्मग्रंथ आणि पुराणमत दंतकथांद्वारे बळकटी देण्याचे सतत प्रयत्न सुरू होते.
अमेरिकन मराठी मिशनने मार्च १८२४ मध्ये मुंबईत मुलींसाठी शाळा सुरू केली होती. गंगाबाई नावाच्या स्थानिक महिलेने या शाळेत अध्यापन केले. मात्र कॉलऱ्याच्या साथीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याने शाळेचे काम बंद पडले. पुढे पुन्हा मुलींच्या शाळा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. १८२६ मध्ये मुलींसाठी नऊ शाळा सुरू होत्या आणि त्यामध्ये २०४ विद्यार्थिनी शिकत होत्या. १८२७ च्या अखेरीस सिंथिया फॅरार मिशनच्या कार्यात सहभागी झाल्या. त्यांनी या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
१८२९ च्या मिशन अहवालानुसार मुलींच्या शाळांमध्ये ४०० पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिकत होत्या. त्यापैकी १२२ मुलींना चांगले वाचन करता येत होते आणि त्या सुंदर अक्षरात लिहू शकत होत्या.
१८३४ च्या अहवालात मुंबईतील मुलींच्या शाळांच्या अधीक्षक म्हणून मिस् सी. फॅरार यांचा उल्लेख आहे. १८३६ मध्ये त्यांनी मुंबईत मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळाही सुरू केली. या शैक्षणिक उपक्रमांमधून त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, शिक्षणाविषयीची निष्ठा आणि मुलींच्या शिक्षणाबद्दलची तळमळ दिसून येते.
अहिल्यानगरमध्ये स्त्रीशिक्षणाची धुरा : १८३९ मध्ये भारतात परतल्यानंतर सिंथिया फॅरार यांनी अहमदनगरमध्ये मुलींच्या शिक्षणाचे काम सुरू ठेवले. त्याकाळात अहमदनगर हे अमेरिकन मराठी मिशनच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे महत्त्वाचे केंद्र होते. याच काळात त्यांनी आपली बहीण नॅन्सी आणि आई-वडीलांना नगरमधून पत्र लिहून येथील खबरबात कळविली, मुळात हे पत्र वाचण्यासारखे आहेत. हे वाचत असताना आपणही त्याकाळात हरवून जातो.
मुलींना शाळेत आणणे, पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थिनींची उपस्थिती टिकवून ठेवणे आणि शाळांचे व्यवस्थापन करणे ही कामे त्या सातत्याने करत होत्या. अमेरिकन मराठी मिशनच्या १८४५ आणि १८४६ च्या अहवालांनुसार त्यांच्या देखरेखीखाली मुलींच्या चार शाळा सुरू होत्या आणि त्यामध्ये शंभराहून अधिक विद्यार्थिनी शिकत होत्या.
मुलींचे बालवयात विवाह करणे, शिक्षणाबद्दल पालकांमध्ये उदासीनता असणे आणि सामाजिक विरोध अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. विद्यार्थिनींचे शाळेत येणे बंद होऊ नये म्हणून त्या वैयक्तिक लक्ष देत असत. विद्यार्थिनींमध्ये शिकण्याची आवड निर्माण करणे, पालकांशी सुसंवाद ठेवणे आणि त्यांच्याशी आपुलकीचे नाते जोडणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होती. अहिल्यानगरमधील मुलींच्या शिक्षणाच्या इतिहासात त्यांचे हे योगदान महत्त्वाचे आहे. या उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका : सिंथिया फॅरार यांच्या कार्याचा महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाशी जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक प्रशिक्षण. सावित्रीबाईंच्या शिक्षणाची सुरुवात महात्मा जोतिराव फुले यांनी घरी केली. त्यानंतर त्यांना अध्यापनासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणाच्या प्रवासात तत्कालिन अहमदनगर येथील मिस् फॅरार यांची शाळा म्हणजे विद्यमान ‘क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल’ आणि पुण्यातील मिस् मिशेल यांची नॉर्मल स्कूल या दोन्हींचा उल्लेख आढळतो.
इतिहास संशोधक कै.डॉ. हरी नरके यांनी २००८ मध्ये एनसीईआरटीसाठी दिलेल्या ‘सावित्रीबाई फुले प्रथम स्मृतिव्याख्यानात’ सावित्रीबाईंनी अहमदनगर येथील मिस् फॅरार यांच्या संस्थेत आणि पुण्यातील मिस् मिशेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण घेतल्याची नोंद केली आहे. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या इंडियन एक्स्प्रेसच्या ऐतिहासिक लेखातही हरी नरके यांच्या या संशोधनाचा संदर्भ देण्यात आला आहे.
या संदर्भांमुळे सावित्रीबाईंच्या शिक्षक घडणीमध्ये मिस् सिंथिया फॅरार यांच्या शाळेचे स्थान स्पष्ट होते. सावित्रीबाईंनी पुढे पुण्यातील मुलींच्या शाळांमध्ये अध्यापन केले आणि मुख्याध्यापिका म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सावित्रीबाईंच्या शैक्षणिक प्रवासातील अहिल्यानगरचा हा टप्पा महाराष्ट्राच्या स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे.
महात्मा फुले यांना मिळालेली प्रेरणा : मिस् सिंथिया फॅरार आणि महात्मा फुले यांच्यातील संबंध हा केवळ शिक्षक- विद्यार्थी प्रशिक्षणापुरता मर्यादित नव्हता. फॅरार यांच्या मुलींच्या शाळांचे काम पाहून जोतिराव फुले यांना स्त्रीशिक्षणाच्या कार्यासाठी प्रेरणा मिळाल्याची नोंद खुद्द फुलेंनी करून ठेवली आहे. जोतिरावांचे मित्र सदाशिव गोवंडे हे अहमदनगर येथे सध्याच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील सहकार क्रिडा मंडळजवळील जुन्या इमारतीतील ब्रिटिश खात्यातील कार्यालयात नोकरीला होते. फुले नेहमी त्यांच्याकडे येत. त्यांच्यासोबत जोतिराव फुले यांनी मिस् फॅरार यांच्या शाळेला भेट दिली. तेथील मुलींचे शिक्षण, शाळेचे व्यवस्थापन आणि अध्यापन पद्धती पाहून ते प्रभावित झाले.
१८५३ मधील आपल्या निवेदनात जोतिरावांनी अहमदनगर येथील अमेरिकन मिशनमधील मिस् फॅरार यांच्या शाळांना मित्रासोबत भेट दिल्याचा उल्लेख केला आहे. त्या शाळांमध्ये मुलींना ज्या पद्धतीने शिक्षण दिले जात होते, ते पाहून आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे पुण्यात परतल्यानंतर मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या आपल्या प्रयत्नांना त्यांनी गती दिली. तसेच १९ ऑक्टोबर १८८२ रोजी सर विल्यम् हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेल्या निवेदनात जोतिरावांनी स्त्रीशिक्षणाच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या पूर्वीच्या ख्रिस्ती मिशनरी शाळांचा उल्लेख केला आहे.
अमेरिकन मराठी मिशनच्या १८६२ च्या वार्षिक अहवालातील मिस् सिंथिया फॅरार यांच्या मृत्युस्मरण लेखातही पुण्यातील एका तरुणाला मुलींच्या शाळा सुरू करण्यासाठी फॅरार यांनी सल्ला आणि मार्गदर्शन केल्याचा उल्लेख आहे. त्या तरुणाचे नाव दिलेले नसले, तरी इतर ऐतिहासिक संदर्भांशी त्याची सांगड घातल्यास हा उल्लेख महात्मा जोतिराव फुले यांच्याशी संबंधित असल्याचे कळते.
यावरून मिस् सिंथिया फॅरार यांचे कार्य केवळ अहमदनगर तथा अहिल्यानगरपुरते मर्यादित नव्हते; महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या व्यापक चळवळीशी त्यांचे योगदान जोडलेले होते.
महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात ज्या शाळा सुरू केल्या त्यापैकी भिंगार येथेही एक शाळा सुरू केल्याचा उल्लेख स्पष्ट आहे, अशी माहिती विकास चव्हाण यांनी दिली. तिचेही स्मृतिस्थळ व्हावे अशी मागणी त्यांनी केली.
कामिल पारखे यांचे संशोधनपर चरित्र : सिंथिया फॅरार यांचे जीवनकार्य आणि महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील त्यांचे योगदान लोकांसमोर आणण्यात ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. अमेरिकन मराठी मिशनचे वार्षिक अहवाल, ऐतिहासिक दस्तऐवज, जुन्या नियतकालिकांमधील नोंदी आणि विविध चरित्रग्रंथांचा अभ्यास करून पारखे यांनी सिंथिया फॅरार यांचे मराठी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे नाव आहे ‘सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका : सिंथिया फरार’ सदर पुस्तक विमलकीर्ती प्रकाशन, चाळीसगाव, महाराष्ट्र यांनी प्रकाशित केले आहे.
सिंथिया फॅरार यांच्या जीवनकार्याची माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे हे चरित्र महत्त्वाचे संदर्भसाधन आहे. विशेषतः सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षक प्रशिक्षणाचा तत्कालीन अहमदनगरशी असलेला संबंध आणि महात्मा फुले यांच्या स्त्रीशिक्षणविषयक प्रेरणेचा इतिहास समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. मिस् सिंथिया फॅरार यांचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये केवळ एका मिशनरी महिलेपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या विकासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आणण्याचे काम या संशोधनामुळे झाले.
३५ वर्षांची शिक्षणसेवा आणि अहमदनगरमध्ये निधन : मिस् सिंथिया फॅरार यांनी भारतात जवळपास ३५ वर्षे शिक्षण आणि समाजप्रबोधनाचे काम केले. मुंबई आणि अहमदनगरमधील मुलींच्या शाळांचे व्यवस्थापन, अध्यापन आणि शिक्षणप्रसारासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. २५ जानेवारी १८६२ रोजी नगर येथे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ६६ वर्षे होते.
त्यांच्या कबरीवरील इंग्रजी शिलालेखात त्यांच्या जन्ममृत्यूच्या तारखांसह त्यांनी हिंदू महिलांच्या शिक्षणासाठी आणि आध्यात्मिक प्रबोधनासाठी ३५ वर्षे कार्य केल्याची नोंद आहे. कबरीवरील अखेरचे वाक्य विशेष अर्थपूर्ण आहे, ‘Her works do follow her.’ म्हणजेच, ‘त्यांची कर्मे त्यांच्यानंतरही त्यांची साक्ष देत राहतील.’
खरोखरच, त्यांच्या कार्याची साक्ष आज स्त्रीशिक्षणात पुढारलेला शैक्षणिक प्रगतीशिल महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षक प्रशिक्षणाच्या इतिहास, महात्मा फुले यांच्या लेखनातून आणि अहिल्यानगरमधील मुलींच्या शिक्षणाच्या परंपरेतून मिळते.
शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ तब्बल १६४ वर्षांनंतर सिंथिया फॅरार यांच्या कबरीचा शोध : मिस् सिंथिया फॅरार यांचे निधन अहमदनगर येथे झाले, याची ऐतिहासिक नोंद इतिहासात होती. मात्र त्यांची कबर नेमकी कोणत्या कब्रस्तानात आणि कुठे आहे, याची माहिती अनेक वर्षे उपलब्ध होत नव्हती. त्यांच्या कबरीवरील नावाचा शिलास्तंभ अमेरिकेतील दफनभूमीत दाखविला जात होता. परंतु त्यांचे निधन नगरमधे झाले. त्यांचा देह अमेरिकेला नेलाच नाही मग त्यांची कबर नगरमधेच असली पाहिजे, असा शोध सुरू झाला.
त्यांच्या कबरीचा शोध घेण्यासाठी जुन्या ऐतिहासिक नोंदी, लोकवार्ता, अमेरिकन मराठी मिशनचे वार्षिक अहवाल, कब्रस्तानांमधील शिलालेख आणि उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करण्यात आला.
अहिल्यानगरमधील इतिहासप्रेमी मंडळाच्या संशोधन पथकाने सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांच्यासह सिद्धार्थनगर परिसरातील कब्रस्तानात शोध घेतला. मात्र तेथे कबर सापडली नाही. त्यानंतर भुईकोट किल्ल्यापासून काही अंतरावर असलेल्या बुऱ्हाणनगर रस्त्यावरीस दमडी मशिदीमागील सेंट झेव्हियर्स कब्रस्तानात शोधमोहीम सुरू करण्यात आली.
शुक्रवारी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून जुन्या कबरींची पाहणी आणि शिलालेखांचे निरीक्षण, संशोधन सुरू होते. सकाळी सुमारे १०.१५ वाजता इंजि. अभिजित एकनाथ वाघ यांना एका दगडी कबरीवरील Miss Cynthia Farrar हे नाव स्पष्टपणे दिसले. मास्टरकाका तथा असिफखान दुलेखान आणि भैरवनाथ वाकळे यांनीही तातडीने तेथे जाऊन पाहणी केली. कबरीवरील जन्ममृत्यूच्या तारखा आणि स्मृतिलेख तपासल्यानंतर हीच मिस् सिंथिया फॅरार ‘आई’ची कबर असल्याची खात्री झाली.
या शोधप्रक्रियेत ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांचे ऐतिहासिक संशोधन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच संध्या मेढे, सॅम्युअल वाघमारे आणि निवृत्त प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे सचिव इंजि.अभिजित एकनाथ वाघ, अध्यक्ष आसिफखान दुलेखान आणि भैरवनाथ वाकळे यांच्या प्रत्यक्ष शोधकार्यामुळे हा ऐतिहासिक दुवा समोर आला.
बोरीच्या झाडाखाली असलेल्या या दगडी कबरीवरील नाव आणि स्मृतिलेख आजही वाचता येतात.
In the memory of
Miss Cynthia Farrar of the American Mission
Born April 20, 1795 Died January 25, 1862. For 35 years she laboured for the education and spiritual enlightenment of Hindoo females.
Her works do follow her
दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या कबरीचा शोध लागणे ही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यातील अहिल्यानगरच्या इतिहास संशोधनातील महत्त्वपूर्ण घटना ठरली.
इतिहासाचे ऋणानुबंध जपण्याची गरज : महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाचा इतिहास हा अनेक व्यक्तींच्या योगदानातून घडलेला आहे. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि त्यांच्या समकालीन शिक्षणप्रसारकांनी स्त्रीशिक्षणाच्या चळवळीला दिशा दिल्याचा इतिहास स्पष्ट आहे.
या इतिहासात मिस् सिंथिया फॅरार यांचे योगदानही विशेष महत्त्वाचे आहे. एका अविवाहित अमेरिकन महिलेने भारतात येऊन प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या कार्याने महात्मा फुले यांना प्रेरणा दिली आणि सावित्रीबाईंच्या शिक्षक प्रशिक्षणाच्या प्रवासात अहिल्यानगरचा महत्त्वाचा टप्पा निर्माण केला.
आज त्यांच्या कबरीचा शोध लागल्यामुळे अहिल्यानगरच्या इतिहासातील हा विस्मृतीत गेलेला अध्याय पुन्हा उजेडात आला. ही कबर केवळ एका परदेशी अमेरिकन मिशनरी महिलेची कबर नाही तर ती महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासाची साक्षीदार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक जडणघडणीशी जोडलेला अहिल्यानगरचा दुवा आहे. महात्मा फुले यांच्या स्त्रीशिक्षणविषयक प्रेरणेचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फॅरार यांची कबर शोधणे म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या कबरीचा शोध नव्हे; तर महाराष्ट्राच्या स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील विस्मृतीत गेलेला एक महत्त्वाचा अध्याय पुन्हा उजेडात आणणे होय.
माळीवाडा बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या स्टेशनरोडवरील क्लेरा ब्रूस गर्ल्स स्कूलचा संबंधही या मिशनच्या मुलींच्या शाळांच्या ऐतिहासिक परंपरेशी जोडला गेला आहे. ‘महात्मा फुले, सावित्रीबाई आणि सिंथिया फॅरार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली’ ही शाळा काही असामाजिक घटक शासकीय यंत्रणेला हातशी धरून बंद पाडण्याचा खटाटोप करत असल्याचे जाणवते.
यंदा भारत सरकारने ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२८ या कालावधीत महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी स्मरणोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनानेही ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ हा कालावधी ‘महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष’ म्हणून निश्चित केला आहे. या निमित्ताने सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मिस् सिंथिया फॅरार यांच्या कार्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांना प्रत्यक्ष भेट द्यावी. या स्थळांची सद्यस्थिती आणि झालेली दुरवस्था पाहून त्यांच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करावा किंवा आपल्या अधिकारात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मिस् सिंथिया फॅरार आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक इतिहासाशी संबंधित ‘क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल’ शासनाने ‘खास बाब’ म्हणून ‘आदर्श मॉडेल स्कूल’ म्हणून पुन्हा सुरू करून विकसित करावी. सध्या या शाळेवर प्रशासक असून, शाळेच्या सद्यस्थितीबाबत आणि व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ही ऐतिहासिक शाळा बंद पडू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पुढाकार घ्यावा. सध्या या शाळेवर प्रशासक असून त्यांच्याच दुर्लक्षामुळे ‘सावित्रीबाईंची शाळा’ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आम्ही यासाठी लवकरच त्यांची भेट घेणार आहोत.
अहिल्यानगरच्या भूमीला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करणे, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचे, मिस् सिंथिया फॅरार यांच्या कबरीचे संवर्धन करणे, त्यांचे मूळ छायाचित्र मिळविणे, फुले दांपत्य आणि फॅरार यांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण करणे आणि त्यांच्या योगदानाची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे, ही आता आपली सामूहिक जबाबदारी आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


