Radio Nagar: स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएमतर्फे दिवाळीअंक स्पर्धेचे आयोजन - Rayat Samachar

Radio Nagar: स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएमतर्फे दिवाळीअंक स्पर्धेचे आयोजन

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | २७.१० | रयत समाचार 

Radio Nagar: मराठी साहित्यविश्वातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्यासाठी आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०.४ एफएमच्या वतीने दिवाळी अंक स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिवाळी अंकांची दखल घेण्यात येणार असून, उत्कृष्ट अंकांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

मराठी साहित्यसंस्कृतीमध्ये दिवाळी अंकांना विशेष महत्त्व आहे. कथा, कविता, वैचारिक लेख, समीक्षा, ललित लेखन आणि विविध साहित्यप्रकारांनी सजलेले दिवाळी अंक वाचकांना साहित्याची समृद्ध मेजवानी देतात. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासोबतच लेखक, संपादक आणि प्रकाशकांच्या साहित्यिक प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रेडिओ नगर ९०.४ एफएमने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन दिवाळी अंकांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व दिवाळी अंकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी दिवाळी अंक पाठविण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२६ अशी आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संपादक आणि प्रकाशकांनी आपल्या दिवाळी अंकांच्या दोन प्रती खालील पत्त्यावर पाठवाव्यात.

अंक पाठविण्याचा पत्ता :

स्नेहालय – रेडिओ नगर ९०.४ एफएम,
प्रतिसाद केंद्र, डॉ. शंकर आडकर संकुल,
लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड,
कमला आयुर्वेद हॉस्पिटलच्या मागे,
अहिल्यानगर.

मराठी साहित्यप्रेमी, लेखक, संपादक आणि प्रकाशकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दिवाळी अंकांच्या समृद्ध साहित्यपरंपरेला बळ द्यावे, असे आवाहन रेडिओ नगर ९०.४ एफएमचे स्टेशन हेड अंशुल सब्बन यांनी केले आहे.

सविस्तर वाचा : सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading