अहिल्यानगर | ६.१० | दिपक शिरसाठ
Nagar Taluka Paisewari: नगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना खरीप पिकांची नजर पैसेवारी चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आल्याचा आरोप करत पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार व सभापती रामदास भोर यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले. नगर तालुक्यातील १२१ महसूल गावांची नजर पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, ही आकडेवारी चुकीची असल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीवर होऊ शकतो, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, उपलब्ध माहितीनुसार नजर पैसेवारी निश्चित करताना चुकीच्या पद्धतीचा अवलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे नुकसान, चारा व पाणीटंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील १२१ महसूल गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याची आकडेवारी शासन दरबारी सादर करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही आकडेवारी चुकीची असल्यास पात्र शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला आहे.
दरम्यान, १२१ महसूल गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक निश्चित करण्यासाठी वापरण्यात आलेली आकडेवारी आणि निकष जाहीर करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या आकडेवारीची फेरतपासणी करून येत्या दोन दिवसांत फेरअहवाल तयार करून सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अंतिम आणेवारी वर्षअखेरीस जाहीर होणार : तहसीलदार
या मागणीवर नगर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नगर तालुक्यातील सध्याच्या नजर पैसेवारीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला नुकसानभरपाई मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अंतिम आणेवारी वर्षअखेरीस जाहीर केली जाईल.
त्यामुळे सध्याच्या नजर पैसेवारीवरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, नजर पैसेवारी निश्चित करण्यासाठी वापरण्यात आलेली आकडेवारी व निकष जाहीर करण्याची मागणी डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


