विश्ववार्ता | १८.९ | प्रभाकर ढगे
(Sudhakar Gaidhani) महाकवी सुधाकर गायधनी यांच्या कवितेचा चाहता जगभर पसरत चाललेला आहे. विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात व पाठ्यपुस्तकांत त्यांच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत. नागपूर विद्यापीठात एम.ए. मराठीच्या परीक्षेत त्यांनी स्वतःच्या कवितासंग्रहावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हा अपवादात्मक योग आहे. असे असले तरी मराठी साहित्यातील कथित थोर दिग्गजांनी सुधाकर गायधनी यांना अनेक सन्मानांपासून आजही उपेक्षित ठेवले आहे.
(Sudhakar Gaidhani) २००५ मधे पुण्यात त्यांच्या ‘महावाक्य’ या महाकाव्यावर झालेल्या महाचर्चेत ‘महावाक्य’ला ज्ञानपीठ मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक के.ज. पुरोहित व डॉ. प्रल्हाद वडेर यांनी व्यक्त केली होती. पण त्यानंतर या महाकवीची पध्दतशीर कोंडीच करण्यात आली. त्यांच्या कवितेची चर्चाच होणार नाही, अशी व्यूहरचना केली गेली. अस्सल साहित्याची भलावण करण्याऐवजी बहुतेकवेळा भलत्याच ‘भाकड’ साहित्यकृतीला साहित्य अकादमी तथा ‘ज्ञानपीठ’सारखे पुरस्कार मिळवून देऊन मराठीतील टोळीबाजांनी खऱ्या प्रतिभावंतांची आजपर्यंत नेहमीच मुस्कटदाबी केली आहे. त्यास सुधाकर गायधनी हेही अपवाद नाहीत.
(Sudhakar Gaidhani) मराठीची लोकल वेस ओलांडून अनेक देशांची ग्लोबल क्षितिजे कवटाळत निघालेली गायधनी यांची कविता मराठीतील नामवंत समीक्षकांना, आस्वादकांना कळत नाही की, नेहमीप्रमाणेच एखादाला ठरवून अनुल्लेखाने मारण्याच्या ‘सनातन’ बारभाई कारस्थानाचा तो भाग आहे? तो आपल्या गटाचा की त्यांच्या गटाचा, या भजनी मंडळाचा की, त्या काकड आरतीवाल्यांचा, आमच्या बिरादरीचा गंडा बांधून घेतो की त्यांचे ताबूत नाचवतो, सजातीय गोत्राचा की विजातीय सूत्राचा, या पूर्वग्रहदूषित पात्रतेवर कवी- लेखकांची लांबी- रूंदी मोजणारा भणंग गोतावळा जिथे असतो तिथे साहित्य जागतिक उंचीचे होण्याऐवजी अगतिक वंचितांचे झाले तर त्यात नवल ते काय?
गोव्यात २८ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या पहिल्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभलेले मराठीतील एकुलते एक महाकवी सुधाकर गायधनी यांचे गारूड अजूनही गोमंतकीय साहित्य रसिकांच्या मनावर कायम आहे. त्या तीन दिवसातील महाकवींचा सहवास म्हणजे अक्षरशः कविता आणि बोधवाक्यांची बरसात होती. शक्यतो नागपूरच्या बाहेर कार्यक्रमाला न जाणारे सुधाकर गायधनी सर गोव्यातील एकदिवशीय साहित्य संमेलनाला हजर राहणे हा आमच्यासाठी स्वप्नवत अनुभव ठरला. गोव्यातील मराठीप्रेमींनी सरकारचा एकही पैसा न घेता वर्गणी गोळा करून हे संमेलन आयोजित केले आहे, हे सांगितले तेव्हा क्षणभरही विचार न करता सरांनी तत्काळ होकार दिला. नागपूर ते गोवा हे १ हजार १२० किलोमीटरचे अंतर भर उन्हाळ्यात त्यांनी विमान प्रवासाचा पर्याय नाकारून कारने प्रवास करून पार केले. संमेलन संपले तरी सामान्य रसिक वाचक ते गोमंतकीय कवी- लेखक यांच्याशी त्यांचा संवाद आजही चालूच आहे.
सुधाकर गायधनी सरांच्या जगातील अनेक भाषेत पोचलेल्या ‘देवदूत’ पाठोपाठ ‘योगिनींच्या स्वप्नसावल्या’ या महाकाव्याची इंग्रजी अमेरिकेतून प्रकाशित झालेली आवृत्तीही जगभर गाजत आहे. बिरलॅंड देशाने त्यांच्यावर एक पौंड चा पोस्टल स्टॅम्प काढला आहे. नागपूर जवळील खापा या त्यांच्या जन्मगावी तेथील नगरपालिकेने गायधनी यांच्या हयातीतच अडीच एकरात ‘महाकवी सुधाकर गायधनी उद्यान’ निर्माण केले आहे. जगातील ३५ भाषांमध्ये ज्यांची कविता पोचली आहे असा मराठी महाकवी रोज जागतिक सन्मानाने गौरविला जात आहे.
केवळ मराठी आणि भारतीय साहित्य जगतालाच नव्हे तर जागतिक साहित्याचा सन्मान वाढविणाऱ्या या महाकवीचे आणखी एक महाकाव्य आकारास येत आहे. हे महाकाव्य जगभरातील काव्य परंपरेला अत्युच्च परिमाण मिळवून देईल, असा विश्वास वाटतो.
रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतर साहित्यातील नोबेल भारतीय भाषेत कोणाला मिळायचे असेल तर त्यासाठी मराठी महाकवी सुधाकर गायधनी हे या सर्वोच्च सन्मानास पात्र असलेले आजचे एकमेव भारतीय नाव आहे, ही भविष्यवाणी गोव्याने सर्वप्रथम केली आहे. हे भाकीत लवकर साकार होवो, ही सदिच्छा.
महाकवी सुधाकर गायधनी यांच्या वाढदिवसानिमित्त व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगीतकार आणि कवी न्गोक ली निन्ह यांनी गायधनी यांची ‘बटरफ्लाईज ऑफ लव्ह’ ही कविता संगीतबद्ध करून जगभर प्रसारित केली आहे. वाल्स’ (Valse) ही संगीत शैली, जो ‘वॉल्ट्झ’ (Waltz) या फ्रेंच शब्दाचा समानार्थी आहे, एक पाश्चात्य संगीत प्रकार असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ३/४ किंवा ट्रिपल टाइम सिग्नेचरची लय. आधी हेच गीत Tango शैलीत स्वरबद्ध केले आणि आता या दुसऱ्या शैलीतही व्हिएतनाम येथून जगभर प्रसारित झाले.
‘बटरफ्लाईज आॕफ लव्ह’ ची
सुधाकर गायधनी सरांचे अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले महाकाव्य ‘देवदूत’ची इटालियन आवृत्ती इटली देशातून नुकतीच प्रकाशित झाली आहे. महाकवी सुधाकर गायधनी सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
हे ही वाचा : History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.





