Drug Menace Maharashtra | आता तरी जागे होणार का शाह? 'उडता पंजाब'नंतर महाराष्ट्रही अमली पदार्थांच्या विळख्यात? - Rayat Samacharअमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राजू शेट्टींची मागणी; महाराष्ट्र नशामुक्त करण्याची घोषणा करा
Ad imageAd image

Drug Menace Maharashtra | आता तरी जागे होणार का शाह? ‘उडता पंजाब’नंतर महाराष्ट्रही अमली पदार्थांच्या विळख्यात?

कोल्हापूर दौऱ्यात शहा यांनी ठोस घोषणा करावी; राजू शेट्टी यांची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; महाराष्ट्रातील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.SubEditor | Dipak Shirasath

कोल्हापूर | २०.६ | रयत समाचार

(Drug Menace Maharashtra) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येवर तीव्र चिंता व्यक्त केली. कोल्हापूर आणि इचलकरंजी ही शहरे आता अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराची केंद्रे बनत चालल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

(Drug Menace Maharashtra) राजू शेट्टी म्हणाले , सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील मिळून दीड लाखांहून अधिक तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यभर ही समस्या झपाट्याने वाढत असून पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नक्षलवादावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करणाऱ्या सरकारला अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यात अपयश येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

(Drug Menace Maharashtra) त्यांच्या मते, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गावागावांत गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, मेथाम्फेटामाइन, अफू आणि कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे खून, टोळी युद्ध, चोरी, दरोडे आणि मारामाऱ्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून शांतताप्रिय कोल्हापूर जिल्ह्याची प्रतिमा धोक्यात आली.
शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक वसाहती परिसरातही अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, संबंधित ठिकाणांची माहिती पोलिसांना असूनही कथित आर्थिक हितसंबंधांमुळे कठोर कारवाई होत नाही. किरकोळ पेडलर्सवर कारवाई केली जाते; मात्र संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
आज कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने अमली पदार्थांविरोधात प्रभावी मोहीम राबविण्यात अपयश आल्याची टीका शेट्टी यांनी केली.
मटका, जुगार आणि अवैध दारू विक्री ही काही ठिकाणी पोलिसांच्या कमाईचे साधन बनल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, नाशिक, सोलापूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर, रत्नागिरी यांसह राज्यातील अनेक शहरांमध्ये अमली पदार्थांचे जाळे विस्तारत असल्याचा दावा त्यांनी केला.
देशाचे भविष्य घडविणारी विद्यार्थी पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत जात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रश्नात थेट हस्तक्षेप करून महाराष्ट्राला ‘नशामुक्त राज्य’ करण्यासाठी ठोस धोरण आणि विशेष मोहीम जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी यांचे हे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान समोर आले आहे. या दौऱ्यात भाजपच्या संघटनात्मक बैठका, कार्यकर्ता मार्गदर्शन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading