Crime | डॉ. आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, वंचित आघाडी आक्रमक

डॉक्टरी परवाना रद्द करण्याची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पारनेर | ३०.५ | रयत समाचार

(Crime) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह व समाजात द्वेष निर्माण करणारा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एका डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित डॉक्टराचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणीही पुढे आली.

(Crime) या प्रकरणात डॉ. मंगेश दत्तात्रय बेकारसे (रा. खारेकर्जुने, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे पारनेर युवक तालुकाध्यक्ष संकेत विनायक पटेकर यांनी याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली.

(Crime) मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर वैद्यकीय व्यवसायानिमित्त भाळवणी परिसरात आले होते. त्यांनी फेसबुक अकाउंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदान, लंडनमधील वास्तव्य आणि वकिली व्यवसायासंदर्भात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच काही कमेंट्समधून सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला.

ही पोस्ट २१ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाळवणी परिसरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच काही संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपी डॉक्टरचा निषेध करत त्याला काळे फासल्याचा आणि चपलांचा हार घातल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर लढाई सुरू असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारीही पुढे आले होते.
पारनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नितीन खंडागळे यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, हेड कॉन्स्टेबल अनिल हरिभाऊ देवकर पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित डॉक्टराचा वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करावा, यासाठी मेडिकल कौन्सिलकडेही पाठपुरावा केला जाणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

TAGGED:
Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading