मुंबई | २९.५ | रयत समाचार
(FDA) राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारताच तुकाराम मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत बाबा रामदेव यांच्या औषध कंपनीवर मोठी कारवाई केली. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि औषधांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे महाराष्ट्र एफडीएने विविध ठिकाणी छापेमारी करत तब्बल ७३.३४ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त केला.
(FDA) एफडीएकडे विविध माध्यमांतून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर राज्यातील ७ जिल्ह्यांमधील १२ आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रे आणि आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. औषधे व जादूटोणा विरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली.
(FDA) कारवाईदरम्यान दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, गंभीर आजारांवर हमखास उपचारांचे दावे आणि नियमबाह्य प्रचार करणाऱ्या औषधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेषतः हरिद्वारस्थित ‘दिव्या फार्मसी’च्या उत्पादनांवर विविध विभागांत मोठ्या प्रमाणावर जप्ती करण्यात आली.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकत्रित कारवाई करत एफडीएने ७३,३४,६५६ रुपयांचा औषधसाठा जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.
एफडीएआयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कुठलीही सवलत दिली जाणार नाही. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि नियमबाह्य औषध विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील.
या कारवाईमुळे राज्यभरातील आयुर्वेदिक औषध व्यवसाय आणि जाहिरात क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
