अहमदनगर | २९.५ | रयत समाचार
(Agriculture) कांद्याला किमान ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे आणि हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.
(Agriculture) राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून बाजारात कांद्याला अत्यल्पदर मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक, मजुरी, साठवणूक आणि शेती खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
(Agriculture) अवकाळी पाऊस, हवामानातील बदल आणि वाढते इनपुट खर्च यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बाजारातील पडलेल्या दरांचा दुहेरी फटका बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
केंद्र सरकारकडून वेळोवेळी लादण्यात येणारी निर्यात बंदी, अपुरी साठवणूक व्यवस्था आणि बाजार हस्तक्षेपाचा अभाव यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यामध्ये सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, संगीता साळवे, हेमलता शेळके, दत्ता गोंदके, बाळासाहेब भोर, अजित चौधरी, दत्ता कोंडार, योगेश भरितकर, बाळासाहेब मधे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनापूर्वी अकोले शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत, वारंवार लादण्यात येणाऱ्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले. कांद्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन धोरण आखून साठवणूक क्षमता वाढवावी, निर्यात बंदीऐवजी निर्यात प्रोत्साहनाचे धोरण स्वीकारावे आणि कांदा उत्पादकांना आर्थिक संरक्षण द्यावे, अशा मागण्याही आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
