Press | मुंबई प्रेस क्लबमध्ये ‘एकाधिकारशाहीचा प्रयोग’; सुनिल तांबे यांचा गंभीर आरोप

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ३.५ | रयत समाचार

(Press) मुंबई प्रेस क्लबमध्ये ‘एकाधिकारशाहीचा प्रयोग’ सध्या सुरू असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी केला. सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी प्रेस क्लबच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

(Press) तांबे यांनी सांगितले की, ते सलग तीन वेळा मुंबई प्रेस क्लबच्या मॅनेजिंग कमिटीवर कार्यरत होते. त्या काळात पत्रकारांना घर मिळावे यासाठी त्यांनी आणि सहकाऱ्यांनी मोठा पाठपुरावा केला. प्रफुल्ल मारकपार यांनी गुरबीर सिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घडवून आणली. त्यानंतर सायन कोळीवाडा येथे पत्रकारांसाठी प्रेस एन्क्लेव उभारण्यात आले.

(Press) म्हाडाच्या सूचनेनुसार अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र अर्जांची छाननी व पात्रता निश्चितीचा अधिकार म्हाडाकडेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरी कमाल जमीन कायद्यांतर्गत बिल्डरकडून मिळणाऱ्या १० टक्के सदनिकांमधून पत्रकारांना मर्यादित लाभ मिळत होता, पण म्हाडाच्या योजनांमुळे पत्रकारांसाठी स्वतंत्र कोटा निर्माण झाला आणि निवासाचा प्रश्न मार्गी लागला, असे तांबे यांनी नमूद केले.
प्रेस क्लबच्या इमारतीच्या उभारणीतही त्यांनी आपला सहभाग अधोरेखित केला. गुरबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली डेव्हलपमेंट कमिटी स्थापन करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्षपद तांबे यांनी भूषवले. राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचे अनुदान मिळवण्यात आले तसेच देणगीदारांकडून निधी उभारण्यात आला. सर्व खर्च पारदर्शक पद्धतीने मंजूर व्हावा यासाठी नियमित स्पेशल जनरल बॉडी मिटिंग घेण्यात येत होती, असे त्यांनी सांगितले.
त्यावेळी प्रेस क्लबमध्ये सार्वजनिक चर्चा, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन आणि मुलाखती यांसारखे बौद्धिक कार्यक्रम होत असत. भालचंद्र नेमाडे यांच्या चर्चासत्रासह परंजोय गुहा ठाकुरता यांच्या पुस्तक प्रकाशनास मोठी उपस्थिती लाभली होती. तसेच गुरबीर सिंग, कुमार केतकर, टी.एन. रघुनाथा, प्रकाश अकोलकर यांसारख्या पदाधिकाऱ्यांच्या काळात विविध उपक्रम राबवले जात होते.
मात्र सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना तांबे यांनी खंत व्यक्त केली की, आता प्रेस क्लबमध्ये केवळ कराओके नाईट्ससारखे कार्यक्रम होतात. ‘गोदी मीडियाप्रमाणेच प्रेस क्लबमध्येही नरेंद्र मोदी यांच्या शैलीचे अनुकरण करणारी एकाधिकारशाही सुरू आहे आणि त्याला काही ‘भक्त’ मंडळींचा पाठिंबा आहे, असा आरोप त्यांनी केला.
प्रेस क्लबचे झपाट्याने अधःपतन होत आहे. ही परिस्थिती बदलावी, अशी अपेक्षा आहे, असे सांगत त्यांनी शेवटी आशावाद व्यक्त केला. We cannot eat hopes but they keep us alive, hence hope is the only strategy.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading