अहमदनगर | १८.४ | रयत समाचार
(Entertenment) महाराष्ट्रातील समांतर, प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या कलावंतांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समांतर रंगभूमी कलावंत संघटनेची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली असून, डॉ. श्याम वसंत शिंदे यांची राज्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तर यासह राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या घोषणा करण्यात आल्या. कलावंतांच्या न्यायहक्कांसाठी एक भक्कम मंच उभा राहिला आहे.
(Entertenment) शासनाच्या विविध स्पर्धा, अनुदान योजना, सांस्कृतिक महोत्सव तसेच निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, निर्णय प्रक्रियेतील अस्पष्टता आणि कलावंतांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटित व कायदेशीर लढा उभारण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली.
(Entertenment) यापूर्वी अस्तित्वात असलेल्या अनेक संस्था धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत असल्यामुळे त्यांच्या कार्यावर काही कायदेशीर मर्यादा येत होत्या. त्यामुळे कलावंतांच्या प्रश्नांवर ठोस आणि प्रभावी भूमिका घेणे कठीण होत होते. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र, सक्षम आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम संघटना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, कलावंतांचे हक्क डावलले गेले तर ठाम भूमिका घेतली जाईल. तंत्रज्ञ व बॅकस्टेज कलावंतांवरील अन्यायालाही आवाज दिला जाईल. स्पर्धा व महोत्सवांमध्ये पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील
राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्यामुळे संघटनेचा विस्तार व्यापक स्वरूपात होणार आहे.
जाहीर कार्यकारिणी अशी : अध्यक्ष – डॉ. श्याम शिंदे (अहिल्यानगर), सचिव – दिनेश कवडे (नांदेड), उपाध्यक्ष (प्रशासकीय) – संजय भाकरे (नागपूर), उपाध्यक्ष (उपक्रम) – अरुण कदम (मुंबई), सहसचिव – सागर लोधी (पुणे), कोषाध्यक्ष – विक्रम गवांदे (नाशिक), संघटक – विजय चव्हाण (सिंधुदुर्ग), संघटक – डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर), सल्लागार – अशोक हंडोरे (कल्याण), सदस्य – किरण लोंढे (सोलापूर), सदस्य – डॉ. गणेश शिंदे (धाराशिव)
सध्या महाराष्ट्रातील सुमारे २२० संस्था अनौपचारिकरित्या संघटनेत सहभागी झाल्या असून, त्यांना लवकरच अधिकृत संलग्नता देण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रतिनिधी नियुक्त करून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
अधिक माहिती देताना राज्याध्यक्ष डॉ. श्याम वसंत शिंदे यांनी सांगितले, गेली ३९ वर्षे मी रंगभूमीवर सातत्याने कार्यरत आहे. ३६ मराठी व १९ हिंदी नाटकांचे दिग्दर्शन केले असून २१ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कलावंतांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
एकंदरीत, कलावंतांच्या हक्कांसाठी संघटित आवाज निर्माण करणारी ही संघटना राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
