Ipl

Press | सत्तेला प्रश्न विचारण्याची हिंमत हरवली का? सीएनएनच्या भूमिकेवरून भारतीय माध्यमांवर एस.एम. देशमुख यांचा सवाल

मुंबई | १६.३ | रयत समाचार

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी सीएनएनने  (CNN) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून पत्रकारितेच्या तत्त्वांवर ठाम राहण्याचा संदेश दिला. सत्ताधाऱ्यांच्या धमक्या, टीका किंवा बदनामी यांना न घाबरता सत्य मांडण्याची भूमिका कायम ठेवणार असल्याचे सीएनएनने स्पष्ट केले आहे. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील माध्यमांच्या भूमिकेबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सीएनएनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क थॉम्पसन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आमची पत्रकारिता आमच्या तत्त्वांवर उभी आहे. राजकारणी आपल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकारितेला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आम्ही अमेरिकेसह जगभरातील प्रेक्षकांना सत्य सांगण्याच्या कामात कायम राहणार आहोत.

यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांनी म्हटले आहे, भारतातील अनेक माध्यमांनी सत्तेला प्रश्न विचारण्याची भूमिका कमकुवत केली आहे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जपण्याऐवजी काही मोठे माध्यम समूह सत्तेशी तडजोड करताना दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -
Ad image

जगातील २४ तास सातत्याने बातम्या देणारी पहिली वृत्तवाहिनी म्हणून सीएनएन ओळखली जाते. घटनास्थळी थेट जाऊन वृत्तांकन करणे आणि कठोर प्रश्न विचारणे ही या वाहिनीची ओळख बनली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातही सीएनएनने सत्तेसमोर न झुकता कठोर पत्रकारिता केल्याची उदाहरणे वारंवार चर्चेत आली होती.

एस.एम. देशमुख यांच्या मते, भारतात मात्र अनेक माध्यमे सत्तेच्या दबावामुळे किंवा इतर कारणांमुळे आपली धार गमावताना दिसत आहेत. परिणामी सामान्य नागरिकांमध्ये माध्यमांविषयी अविश्वास वाढत असून ‘गोदी मीडिया’ अशी टीकाही होताना दिसते.

देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, पत्रकारितेवरील आपली निष्ठा स्पष्ट करण्यासाठी सीएनएन प्रमाणे ठाम निवेदन देण्याचे धैर्य भारतातील एखादा तरी मोठा माध्यम समूह दाखवू शकेल का?

पत्रकारितेचे स्वातंत्र्य, सत्तेला प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि सत्य मांडण्याची बांधिलकी या मूल्यांवर माध्यमांनी ठाम राहणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Share This Article