समाजसंवाद | ४.३ | रयत समाचार
(Public issue) आपल्या आजुबाजूला भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट आणि त्यातून निर्माण होणारा रेबीजचा धोका नागरिकांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसू लागला आहे. नुकत्याच घडलेल्या एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर झालेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला. उपचारासाठी धावपळ, रुग्णालयातील ‘लाइन ऑफ ट्रीटमेंट’ आणि रेबीजची कायमची भीती या सगळ्याने पालक आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. याबाबत रस्ते वाहतुक आणि सायबर क्राईम तज्ज्ञ अभिजीत विठ्ठलराव वाघमारे यांनी अधिक माहिती दिली.
(Public issue) रेबीजचा धोका आणि अपुरी व्यवस्था : Rabies हा प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे. वेळेवर लस न घेतल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये २४×७. लसीकरण केंद्रांची कमतरता आहे. जिल्ह्यात किती रेबीज लसी शिल्लक आहेत? दररोज सरासरी किती चावे घेतले जातात?
(Public issue) चाव्यांच्या घटनांशी तुलना करता किती लसी दिल्या जातात? या मूलभूत आकडेवारीबाबत स्पष्ट माहिती प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी यांनाच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दिलेल्या लसींची संख्या आणि प्रत्यक्ष चाव्यांच्या घटनांमध्ये मोठी तफावत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
महापालिकांकडे ठोस ‘ॲक्शन प्लॅन’ नाही : अनेक शहरांमध्ये कमांड कंट्रोल रूम्स असल्या तरी भटक्या कुत्र्यांच्या समस्येसाठी स्वतंत्र ‘स्पेशल स्ट्रे डॉग वॉर रूम’ अस्तित्वात नाही. नसबंदी (स्टरलायझेशन) कार्यक्रम राबवला जात असला तरी त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची चर्चा आहे.
नसबंदी झालेले आणि न झालेले कुत्रे यांची ओळख पटवण्यासाठी कोणती प्रणाली?
लसीकरण झालेले आणि न झालेले यातील फरक कसा ओळखायचा? पिसाळलेल्या (रेबीजग्रस्त) कुत्र्यांचा तत्काळ शोध कसा घ्यायचा? या प्रश्नांची ठोस उत्तरे सध्या उपलब्ध नाहीत.
‘स्ट्रे डॉग ॲप’ची गरज : तज्ज्ञ अभिजीत वाघमारे यांच्या मते, भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करणे काळाची गरज आहे. नागरिकांनी थेट लोकेशन अपलोड करणे. पिसाळलेल्या कुत्र्यांची तातडीने नोंद. रेस्क्यू टीम्सना रिअलटाइम अलर्ट, अशी यंत्रणा उभी राहिल्यास घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवता येऊ शकते.
संवेदनशीलता की सार्वजनिक सुरक्षा? : भटक्या कुत्र्यांना नियमित खाऊ घालणाऱ्या काही नागरीगटांकडून प्राणीसंवर्धनाचा मुद्दा पुढे केला जातो. मात्र नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. “भूक लागली म्हणून चावला”, “समोरून पळाला म्हणून चावला” अशा कारणांनी वाढत्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
प्राणीप्रेम आणि सार्वजनिक आरोग्य यामध्ये संतुलन राखत प्रशासनाने कठोर व पारदर्शक धोरण आखण्याची गरज आहे.
पुढील दिशा नक्की काय असावी हे अभिजीत वाघमारे यांनी सुचविले आहे. प्रत्येक शहरात स्पेशल ‘स्ट्रे डॉग वॉर रूम’, २४x७ रेबीज लसीकरण केंद्र, नसबंदी व लसीकरणासाठी डिजिटल आयडेंटिफिकेशन, जिल्हानिहाय दैनंदिन डेटा सार्वजनिक करणे, तातडीच्या प्रतिसादासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आता केवळ चर्चेपुरते न थांबता कृती आराखडा राबवण्याची वेळ आली आहे. अन्यथा रेबीजच्या भीतीत जगणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच राहील, असा इशारा अभिजीत वाघमारे यांनी दिला.
(लेखक हे रस्ते सुरक्षा तज्ज्ञ आहेत.)
