Education | महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही; विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २४.२ | गुरुदत्त वाकदेकर

(Education) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम ठप्प नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाज्योतीच्या प्रकल्प संचालकांनी दिली.

(Education) महाज्योतीकडून एकूण ११ प्रकारचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्यसेवा तसेच संयुक्त गट-ब व क आणि मिलिटरी भरती प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात सुरू आहेत. यूपीएससी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह १३,००० रुपये विद्यावेतन आणि एकवेळ १८,००० रुपये आकस्मिक निधी दिला जातो. एमपीएससी राज्यसेवा, संयुक्त गट-ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षणासाठी प्रतिमाह १०,००० रुपये विद्यावेतन आणि एकवेळ १२,००० रुपये आकस्मिक निधी देण्यात येतो. या बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

(Education) २०२५–२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणातून २९८, कर्मचारी निवड आयोग प्रशिक्षणातून ४९९, मिलिटरी भरती प्रशिक्षणातून १,५००, एमबीए सीएटी/सीएमएटी/सीईटी प्रशिक्षणातून १,५००, यूजीसी नेट/सीएसआयआर/एमएच-सेट प्रशिक्षणातून १,२००, यूपीएससी प्रशिक्षणातून ४००, एमपीएससी गट-ब व क प्रशिक्षणातून ४००, एमपीएससी राज्यसेवा प्रशिक्षणातून ३००, तर जेईई, एनईईटी व एमएचटी-सीईटी प्रशिक्षणातून ३,५०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
आयबीपीएस पीओ, बँकिंग, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भरती (आरआरबी) आणि एमपीएससी अभियांत्रिकी सेवा या परीक्षांचे स्वरूपच ऑनलाईन असल्याने २०२६–२७ या आर्थिक वर्षापासून हे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचे प्रस्तावित आहे. या विद्यार्थ्यांना विद्यावेतनाऐवजी टॅबलेट आणि डेटा सिम देण्यात येणार आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीकडे ४४,९०३ अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये एमपीएससी अभियांत्रिकीसाठी ४,८३९, एसएससीसाठी १४,४४७, बँकिंग/रेल्वे/एलआयसीसाठी १८,२६५, तर आरआरबीसाठी ७,३५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोठी मागणी असल्याचे स्पष्ट होते.
जेईई, एनईईटी आणि एमएचटी-सीईटी प्रशिक्षण हे २०२१ पासून ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी ४१,८०३ अर्ज प्राप्त झाले होते. टॅबलेटचा बॅटरी बॅकअप किमान १२ तासांचा असल्याने वीज खंडित झाल्यावरही शिक्षणात खंड पडणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात उपलब्ध असलेल्या नेटवर्कनुसार सिम निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
आर्थिक अडचणीमुळे पार्टटाईम नोकरी करणारे विद्यार्थी तसेच घरगुती जबाबदाऱ्यांमुळे शहरात येऊ न शकणाऱ्या गृहिणींनाही दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, हा ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. ऑनलाईन प्रशिक्षणात लाईव्ह मार्गदर्शन, शंका निरसन, साप्ताहिक परीक्षा, पीडीएफ स्वरूपात नोट्स व पुस्तके देण्यात येणार आहेत.
वरील सर्व बाबींचा विचार करता, महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नसून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊनच ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Share This Article