Agriculture | मातीची ‘भू’क ओळखणारे स्मार्ट तंत्रज्ञान; डॉ. पावसे यांच्या संशोधनाला ‘नाबार्ड’चा पुरस्कार

मानवी आरोग्यालाही मोठा दिलासा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

संगमनेर | २२.२ | नितीनचंद्र भालेराव

(Agriculture) जमिनीचा पोत ढासळत चालल्याच्या आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या काळात, संगमनेरच्या एका युवा संशोधकाने शेतीला नवी दिशा दिली आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सुपुत्र आणि राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे यांचे चिरंजीव डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांच्या पीएच.डी. संशोधनाला ‘नाबार्ड’कडून (NABARD) २०२३ सालचा ‘उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध’ हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.Agriculture

(Agriculture) पारंपारिक शेतीत पिकाला सरसकट खत टाकले जाते, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते आणि खर्चही वाढतो. डॉ. प्रणव यांनी विकसित केलेले ‘ट्रॅक्टर चलित सेन्सर आधारित यंत्र’ हे कृषी यांत्रिकीकरणातील एक क्रांतिकारक पाऊल मानले जात आहे. हे यंत्र पिकांची गरज आणि जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता सेन्सरद्वारे तपासते आणि जिथे गरज आहे तिथेच आणि तितक्याच प्रमाणात खताची मात्रा सोडते.

(Agriculture) या तंत्रज्ञानामुळे खतांच्या वापरात थेट ३० टक्के बचत होते. परिणामी, उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. शिवाय, भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण कमी होऊन कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या रासायनिक साखळीला ब्रेक लागेल.

डॉ. प्रणव यांनी हे संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. या यशाबद्दल त्यांना नाबार्डतर्फे एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या नावावर आतापर्यंत १ पेटंट, १ कॉपीराईट आणि २५ संशोधन लेख जमा आहेत, जे ‘क्लायमेट स्मार्ट ॲग्रीकल्चार’ (Climate Smart Agriculture) साठी दिशादर्शक आहेत.
या राष्ट्रीय यशाबद्दल माजीमंत्री बाळासाहेब थोरात, खा.भाऊसाहेब वाकचौरे, डॉ.सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे, राजहंसचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्यासह हिवरगाव पावसा गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी डॉ. प्रणव यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील एका तरुणाने जागतिक दर्जाचे संशोधन करून गावाचे नाव देशपातळीवर नेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading