Social | मेहबूब आलमच्या पराभवाचा अर्थ – प्रभाकर ढगे

उपसंपादक | दिपक शिरसाठ

समाजसंवाद | प्रभाकर ढगे

(Social) बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल सुरस आणि चमत्कारिक लागणार याची पूर्वकल्पना आधी आलेली होतीच. प्रशांत किशोर पांडे आणि असौसुद्दीन ओवैसी यांनी आपले काम चोखपणे केले. उरले सुरले ईव्हीएमने पार पाडले. या निवडणुकीतील निकालाचे अनेक पध्दतीने विश्लेषण होत राहील. तोपर्यंत पश्चिम बंगालचा दिग्विजय जवळ येऊन ठेपलेला असेल.

(Social) बिहार विधानसभा निवडणुकीतील एक पराभव सर्वात लक्षवेधी ठरला आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यानंतर ज्यांच्या साधेपणाची देशभर चर्चा गेली दोन दशके चालली होती ते बलरामपूर विधानसभा मतदारसंघाचे भाकपा मालेचे आमदार काॕम्रेड मेहबूब आलम यांचा पराभव अनेकांना चटका लावून गेला. या मतदारसंघाचे सलग चारवेळा प्रतिनिधित्व केलेले महबूब आलम यांना लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवार संगीता देवी यांच्याकडून अवघ्या १ हजार ३१८ मतांनी पराभूत व्हावे लागले.

(Social) कटिहार जिल्ह्यातील शिवानंदपूर गावात राहणारे महबूब आलम यांचे शंभर मीटरपेक्षाही कमी जागेत असलेले पत्र्याचे शेडचे घर गेल्या २० वर्षात जैसे थे आहे. आमदार म्हणून मिळालेले सरकारी निवासस्थान महबूब आलम यांनी पक्षाच्या कार्यालयासाठी दिले होते. मतदारसंघात विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून न मागता मिळणारे ५ टक्के कमिशनही महबूब आलम यांनी कधी घेतले नाही. त्यामुळे दर पाच वर्षांनी निवडणूक अर्ज भरताना त्यांची संपत्ती अडीच लाख रुपये मालमत्ता एवढीच असायची. ही त्यांच्या घराची एकूण किंमत आहे. हे घरही त्यांना वारसा हक्काने मिळालेले आहे. पत्नीकडे ७५ ग्रॕमचे सोन्याचे दागिने आहेत.

सुरूवातीस टमटम (रिक्षा) चालक असलेल्या महबूब आलम यांनी टमटम चालकांची संघटना बांधून समाजकार्याला सुरूवात केली. आमदार म्हणून निवडून आल्यावर देखील महबूब आलम कामगार व शेतकरी यांच्यासाठी लढे देत राहिले. समाजात जातीयतेचे विष पेरणाऱ्या धर्मांध संघटनांविरूध्द अथक काम करू लागले.

२०२० साली ५३ हजाराहून अधिक मतांची आघाडी घेऊन निवडून आलेल्या महबूब आलम यांना हिंदू- मुस्लिम द्वेषाचाच फटका २०२५ च्या निवडणूकीत बसला. आदिल हसन या मुस्लिम उमेदवाराने स्थानिक ओवैसी बनून मतविभागणीस हातभार लावला.

ज्या बिहार विधानसभेमध्ये ३० हून अधिक मुस्लिम आमदार निवडून यायचे तिथे ही संख्या यंदाच्या निवडणुकीत दहावर आली आहे. कधीकाळी ओबीसी- मुस्लिम एकोप्याचे देशासाठी उदाहरण असलेला बिहार धार्मिक द्वेषाच्या वाटेवरील नव्या ध्रुवीकरणाकडे निघाला आहे. या बदलत्या बिहारमध्ये महबूब आलम सारखा साधा आमदार मुस्लिम म्हणून कसा निवडून येणार?

Social
प्रभाकर ढगे, समुह संपादक, दै. रयत समाचार

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article