अहमदनगर | १७.११ | राजेंद्र देवढे | विशेष प्रतिनिधी
(Public issue) शहरातील वर्दळीच्या व अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या पत्रकार चौकातीत सिग्नल यंत्रणा वर्षभरापासून बंद पडली आहे. या चौकात झालेल्या अनेक अपघातांत कित्येक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.
(Public issue) अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक हे अतिशय वर्दळीचे ठिकाण आहे. नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या या चौकातून शहरातील अनेक उपनगरांतील नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनांवरून ये-जा करत असतात. शहरातील नागापूर व सावेडी उपनगरांतील नागरिकांना व विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांसह हॉस्पिटल्सला जाण्यासाठी याच चौकातून प्रवास करावा लागतो. या चौकाच्या पूर्वेला अनेक हॉस्पिटल्स व न्यायालयही आहे. तसेच दक्षिणेला शहर, जिल्हा रुग्णालय व महाविद्यालये आहेत. तसेच शहरातून नागापूर औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठीही याच चौकातून जावे लागते. तारकपूर बस स्थानकावरून कल्याण रोडकडे जाणाऱ्या व मनमाड महामार्गावरून तारकपूर बस स्थानकाकडे जाणाऱ्या बसगाड्याही याच चौकातून मार्गक्रमण करत असतात. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना, ॲडमीट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना व रुग्णवाहिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तिष्ठत उभे राहावे लागते.
(Public issue) पत्रकार चौकात आजवर शेकडो अपघात झाले आहेत. या अपघातांत अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यालय याच चौकात असूनही येथील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक वृत्तपत्रांची कार्यालये याच चौकात असल्याने या चौकाला पत्रकार चौक म्हणून ओळखले जाते. या चौकातून अनेक पत्रकारांनाही ये-जा करावी लागते. याच चौकात रस्त्याचे काम अर्धवट असल्याने चौक पार करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक पक्षांचे लोकप्रतिनिधी व समाजसेवक याच चौकातून ये-जा करत असूनही या समस्येवर कुणीही आवाज उठवत नाही, हे दुर्दैव आहे. वयस्कर पादचाऱ्यांना हा चौक ओलांडताना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. हे सारे नाकासमोर घडत असूनही वाहतून नियंत्रण शाखाही याकडे दुर्लक्ष करत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीलाही जवळपास वर्ष होत आले आहे. तरीही त्यांचे या असुविधेकडे दुर्लक्ष आहे. अनेक गुन्ह्यांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असले तरी या बंद सिग्नल यंत्रणेकडे त्यांनी अजूनही लक्ष दिलेले नाही.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
