Sports | फुटबॉलपटूंना ‘मेस्सी’सोबत खेळण्याची सुवर्णसंधी; ‘महादेवा शिष्यवृत्ती योजना’ राज्यभर निवड चाचण्या चालू

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २७.१० | रयत समाचार

(Sports) राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रसार आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागामार्फत ‘महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येत आहे.

(Sports) ही योजना १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी असून, अर्जदारांची जन्मतारीख १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान असावी. योजनेअंतर्गत जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय फुटबॉल निवड चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत. या चाचण्यांमधून राज्यातील ३० मुले आणि ३० मुलींची अंतिम निवड करण्यात येईल.

(Sports) निवड झालेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत मैदानात उतरून खेळण्याची अविस्मरणीय संधी मिळणार आहे. ही बातमी राज्यातील फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची ठरणार आहे.

मुंबई जिल्ह्यासाठीची निवड चाचणी मुंबईतील नवल डी’सूझा फुटबॉल ग्राउंड, वांद्रे येथे होणार असून, फुटबॉल खेळात उच्च कौशल्य असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंनीच आपली नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26

तर अधिक माहितीसाठी सुधा राणे- 93228 23035, राज्य क्रीडा मार्गदर्शक मनीषा गारगोटे- 82083 72034 यांना संपर्क साधावा.

Share This Article