पुणे | १८.१० | रयत समाचार
(Ngo) समाजातील उपेक्षित, बेघर आणि मनोरुग्ण व्यक्तींना आयुष्याचा नवा आधार देणारे, तसेच मानवी तस्करीच्या विळख्यात अडकलेल्या आदिवासी कुटुंबांची मुक्तता घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप वसंत गुंजाळ यांना यंदाच्या म्हणजे २०२५ च्या ‘पुष्पा नाथानी पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.
(Ngo) पुणे येथील रेलफोर फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारात गुंजाळ यांना दहा लाख रुपयांचे पारितोषिक आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले. समाजसेवेसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा या पुरस्काराचा उद्देश आहे.
(Ngo) गेल्या अनेक दशकांपासून दिलीप गुंजाळ यांच्या ‘अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळा’ मार्फत रस्त्यावरील बेघर, निराधार, आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी उपचार, निवारा, अन्न, वस्त्र, औषधोपचार आणि पुनर्वसन यांची निःस्वार्थ सेवा केली जाते. त्यांच्या प्रयत्नांतून ११४ आदिवासी कुटुंबांची मानवी तस्करीतून मुक्तता झाली असून, त्या कुटुंबांतील ४८ बालकांना शिक्षण व पुनर्वसनाचा आधार मिळाला आहे.
पुरस्कार स्वीकारताना दिलीप गुंजाळ म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्या सहकाऱ्यांचा, संस्थेतील कार्यकर्त्यांचा, विश्वस्तांचा, देणगीदारांचा आणि प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे, ज्यांनी समाजातील दुर्लक्षितांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत पावलं टाकली.
समाजातील दुर्लक्षित घटकांच्या उद्धारासाठी अखंड झटणाऱ्या अशा कार्यकर्त्यांना सन्मानित करून ‘पुष्पा नाथानी पुरस्कार’ ने पुन्हा एकदा ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ विचाराला अधोरेखित केले.
Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’