शेवगाव | ०७.१० | रयत समाचार
तालुक्यातील रांजणी येतील थोटे पाटील परिवारातील ज्येष्ठ व वारकरी संप्रदायाशी घट्ट नाते असलेल्या गं.भा. राधाबाई ज्ञानदेव थोटे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गं.भा. राधाबाई थोटे या आयुष्यभर धार्मिक कार्य, कीर्तन-भजन, वारकरी परंपरा व समाजहिताच्या उपक्रमांशी जोडलेल्या होत्या. त्यांनी आयुष्यभर कुटुंब व समाज यांचा समतोल राखत स्नेह, संयम आणि संस्कारांची परंपरा जपली.
त्यांच्या पश्चात मुलगा अशोक ज्ञानदेव थोटे (संस्थापक व माजी सरपंच, ग्रामपंचायत रांजणी तसेच व्हा. चेअरमन, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी दहिगाव ने.), सून, तीन नातवंडे शरद अशोक थोटे, डॉ. भारत अशोक थोटे (बालरोगतज्ञ), महेश अशोक थोटे, तसेच नातसुना असा परिवार आहे.
त्या कै. मुरलीधर पाटील घुले यांच्या भगिनी तर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत उत्तम घुले पाटील यांच्या आत्या होत्या. थोटे कुटुंबाने सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे राधाबाईंच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. अंतिम संस्कार रविवारी रांजणी येथील स्मशानभूमीत वारकरी संप्रदायाच्या हरिनाम संकीर्तनासह पार पडले.
त्यांच्या धर्मनिष्ठ, संयमी व समाजाभिमुख जीवनातून अनेकांना प्रेरणा मिळाली, या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
