पुणे | २२ सप्टेंबर | रयत समाचार
(Literature) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ता.२१ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यात मे. डायमंड पब्लिकेशन, शनिवार पेठ येथे उत्साहात पार पडली. संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या सभेत संघाचे अनेक सभासद उपस्थित होते.
(Literature) सभेच्या प्रारंभी राष्ट्रगीत झाले. अध्यक्ष राजीव बर्वे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताच वार्षिक कामकाजास सुरुवात झाली. प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी सभेची नोटीस वाचून दाखवली. त्यानंतर दिवंगत सभासद व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
(Literature) कार्यकारिणी सदस्य किरण आचार्य यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. सन २०२४-२५ या वर्षाचा अहवाल पराग लोणकर यांनी तर आर्थिक ताळेबंद व अंदाजपत्रक कोषाध्यक्ष सुकुमार बेरी यांनी मांडले. त्यावर चर्चेनंतर सभेने मंजुरी दिली. तसेच लेखापरीक्षक अहवालही मंजूर करण्यात आला. पुढील वर्षासाठी लेखापरीक्षक म्हणून अविनाश ओगले यांची निवड करण्यात आली असून त्यांना १५ हजार रुपये मानधन ठरविण्यात आले.
सभेत आयत्या वेळच्या विषयांवरही उत्स्फूर्त चर्चा झाली. त्यात संघाचे आगामी पाचवे प्रकाशक-लेखक साहित्य संमेलन. ग्रंथनिर्मिती व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार सोहळा. ग्रंथालयांच्या समस्या व अनुदानातील विलंब. शाळा-महाविद्यालयांतून ग्रंथखरेदीस होणारे दुर्लक्ष,
या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
यासंदर्भात निर्णय घेताना ठरले की, नोव्हेंबर २०२५ मध्ये संमेलन आयोजित झाले तर याच ठिकाणी पुरस्कार सोहळाही पार पडेल. अन्यथा नोव्हेंबरमध्ये स्वतंत्र पुरस्कार सोहळा घेऊन जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये साहित्य संमेलन होईल. कार्यवाहांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर सभा संपन्न झाल्याचे अध्यक्षांनी घोषित केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या सभेमुळे प्रकाशन विश्वातील महत्त्वाचे प्रश्न व उपक्रमांना नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास सभासदांनी व्यक्त केला.