अहमदनगर |२१ ऑगस्ट | रयत समाचार
(Politics) जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते व प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सैनिकांना शिक्षकांप्रमाणेच निवडणुकांत आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
(Politics) संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ७ पदवीधर मतदारसंघ अस्तित्वात असून, त्यांची एकूण मतदारसंख्या साधारण ९० हजार आहे. त्याचवेळी राज्यात अंदाजे २० लाख सैनिक व अर्धसैनिक असून, त्यांच्या परिवारांसह सुमारे १ कोटी मतदारांचे मोठे संख्याबळ आहे. या पार्श्वभूमीवर सैनिकांसाठी स्वतंत्र राखीव मतदारसंघ स्थापन करण्याची मागणी संस्थेने केली आहे.
(Politics) संघटनेच्या निवेदनात ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्वच स्तरांवर प्रत्येकी एक सैनिक सदस्य निश्चित करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा व लोकसभा यांचा समावेश आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, मुख्य निवडणूक अधिकारी, उपमुख्यमंत्री व सैनिक कल्याण मंत्री यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी आश्वासन दिले की, ही मागणी रास्त असून शासनाकडे सकारात्मक विचारासाठी पाठविली जाईल. यावेळी सैनिक फेडरेशन अहमदनगरचे अध्यक्ष (रि.) कर्नल सुनील राजदेव, जयहिंद संस्थेचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे, कार्याध्यक्ष मेजर बाळासाहेब धांडे, त्रिदल सैनिक संघ निंबळकचे सचिव मारुती ताकपेरे, मेजर बाळासाहेब वाघ व आबासाहेब घुठे उपस्थित होते.
