Public issue | येथील आठवडे बाजार रस्त्यावरच भरत असल्यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांपासून ते व्यापारी व वाहनधारकांपर्यंत सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः बाजाराच्या गर्दीमुळे अग्निशामक वाहनही अडकत असून, आपत्कालीन प्रसंगी दुर्घटनास्थळी वेळेत पोहोचणे कठीण होणार आहे. परिणामी, अशा प्रसंगी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दर बुधवारी भरवण्यात येणारा आठवडे बाजार वीर सावरकर मैदान (बाजारतळ) येथे भरवायचा असूनही, प्रत्यक्षात तो रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात भरतो. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना तसेच वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
अग्निशामक गुंतली आठवडे बाजारी, दुर्घटना स्थळी पोहोचताना होईल बेजारी…
तक्रारी झाल्यानंतर काही दिवस बाजार मैदानात भरवण्यात येतो, मात्र पुन्हा काही आठवड्यांत परिस्थिती जैसे थे होते. ही सातत्याने उद्भवणारी समस्या लक्षात घेता, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष लांडगे यांनी संबंधित विभागाला बाजार कायमस्वरूपी वीर सावरकर मैदानातच भरवण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून जोर धरत आहे.
तसेच, आठवडे बाजार भरत असताना बाजार परिसराबाहेर अग्निशामक वाहन तैनात ठेवावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देता येईल, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.