अहमदनगर | २९ जुलै | प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील महात्मा ज्योतीबा फुले (बालिकाश्रम) रोडवरील लेंडकर मळा, बागडे मळा परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली ही रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, अशी ठाम मागणी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस ओंकार लेंडकर यांनी रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
लेंडकर मळा येथील कमला हॉस्पिटल ते एकदंत कॉलनी आणि बागडे मळा येथील गौरव स्पोर्टस् ते अयोध्या कॉलनी या दोन्ही प्रमुख रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था असून पावसाळ्यात ते अधिकच धोकादायक ठरत आहेत. या रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रिक्षाचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही रिक्षाचालक या मार्गावरून जायला सरळ नकार देतात, परिणामी नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
सरचिटणीस लेंडकर यांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करताना अहिल्यानगर मनपाने या कामाकडे तत्काळ लक्ष देण्याच्या सूचना देण्याची विनंती केली. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे आणि आकाश सोनवणे उपस्थित होते.
दरम्यान, अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील इतर प्रभागांमधील समस्याही नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात मांडल्या. भाजपा सचिव गोपाल वर्मा यांच्या समवेत विनायक देशमुख, बंटी डापसे, महेश नामदे आदी नागरिक विविध प्रश्नांसह उपस्थित होते.
महानगरपालिका प्रशासकाकडून शहरातील नागरी समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.