(Social) साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, माणगाव येथे छावणी युवा स्नेहमेळावा ता.२८ व २९ जून २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नांदेड येथून माजी छावणीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
(Social) कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री नीरजा यांच्या कविता वाचनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकेश गायकवाड होते. प्रमुख उपस्थिती राजेश कुळकर्णी, प्रमुख पाहुणे संदेश कुळकर्णी होते. राजनभाई इंदुलकर यांनी प्रास्ताविक तर ॲड. विजय दिवाणे यांनी सूत्रसंचालन केले.
(Social) स्नेहमेळावा म्हणजे केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम नसून, सामाजिक जाणीवा जागवणारा आणि पुढील कार्यदिशा निश्चित करणारा विचारमंच ठरला. सहभागी कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याचा परिचय करून देत कार्यातील अडचणी आणि त्यावरील उपाय यावर मोकळा संवाद साधला.
‘पुरोगामी विचारांचे अधिष्ठान’ ही स्मारकाची ओळख असल्याने या मंचाच्या माध्यमातून नव्या पिढीला सामाजिक जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती समजावून देण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या सत्रात कवयित्री नीरजा यांच्या ‘संस्कृती’ या कवितेच्या वाचनानंतर कार्याध्यक्ष राजेश कुळकर्णी यांनी नव्या मंचाचे उद्घाटन केले.
आशुतोष शिर्के यांनी समाजकार्याची सहा सूत्रे मांडली. सेवा, संघर्ष, प्रबोधन, संवाद, निर्माण, निवडणूक या सहा सूत्री कार्यपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन त्या निभावण्याचे आवाहन त्यांनी केले.
सायंकाळच्या सत्रात संस्कृतिक कार्यक्रमात दक्ष रूपवते यांनी ‘आभाळाची लेकरे’, ‘साहू पेटी मशाल’, ‘पाडू चालारे’ यांसारखी चळवळीची गाणी सादर केली. सुदर्शन चकाले यांनी डफसह साथसंगत केली.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने झाली. पहिल्या सत्रात आशुतोष शिर्के यांनी जनसंघटना, ग्रामपंचायत, संस्था, अभ्यासक यांच्या सामूहिक प्रयत्नांतून सामाजिक न्यायासाठी कार्य कसे शक्य आहे हे समजावून सांगितले.
दुसऱ्या सत्रात कार्यकर्त्यांनी स्मारकात स्वयंसेवक म्हणून कसे योगदान देता येईल यावर चर्चा झाली. शुक्लोधन गायकवाड, अजय भोसले, दीपक सोनवणे, दक्ष रूपवते, सुदर्शन चकाले, विनायक साळुंखे, राकेश गायकवाड यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या.
कार्यक्रमात स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर यांनी, “प्रश्न हाताळताना आपली मर्यादा आणि शक्ती ओळखणे आवश्यक आहे,” असे सांगितले. शेवटच्या सत्रात पत्रकार अमेय तिरोडकर यांनी राजकारण, समाजकारण आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. उपस्थित कार्यकर्त्यांच्या शंका व अडचणींचे निरसनही करण्यात आले.
या स्नेहमेळाव्यास माधुरीताई पाटील (खजिनदार), माजी कार्याध्यक्ष राजनभाई इंदुलकर उपस्थित होते. दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे समन्वयन पत्रकार अश्विनी सातव व ॲड. विजय दिवाणे यांनी केले. स्नेहमेळावा नवचैतन्य, नवउर्जा देऊन कार्यकर्त्यांच्या नव्या प्रवासाची नांदी ठरला.