(Art) एका जुन्या काळातील हा दुर्मिळ आणि बोलका फोटो आपल्याला त्याकाळात घेऊन जातो, जेव्हा बाज म्हणजे केवळ झोपण्याचे साधन नव्हते, तर ती ग्रामीण जीवनशैलीचा अभिन्न अंग होती. या चित्रात दिसणारे वयोवृद्ध गृहस्थ पारंपरिक बाज विणत आहेत, आणि त्यांच्यासोबत एक तरुण मुलगाही मदतीला आहे. या दृष्यातून केवळ हस्तकलेचे दर्शन होत नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्याचा, नात्याचा आणि संस्कृतीचा वारसाही स्पष्ट दिसतो.
(Art) पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात अशी काथ्याने, सुताच्या दोऱ्यांची विणलेली बाज असायची. बाज विणणे ही एक कला होती. चांगली ताण देऊन काथ्याच्या अथवा सुताच्या दोरांची घडी बसवायची, मग त्या दोऱ्यांची बारीकसारीक गुंतवणूक करत एकजिनसी विणकाम करायचे, हा संपूर्ण प्रक्रियेला वेळ, चिकाटी आणि कौशल्य लागत असे. अशा बाजेवर झोपणे म्हणजे आराम तर असायचाच, पण त्यात घरच्या माणसांच्या हातचे श्रममूल्यही सामावलेले असे. पुर्वीच्या काळी बाळंतीणीला शेक देण्यासाठी या बाजेचा उपयोग व्हायचा. ज्यांना पाठदुखी आहे त्यांना या बाजेवर झोपल्याने आराम मिळत असायचा.
(Art) या बाजेप्रमाणेच ‘नेवारचा पलंग’ देखील एक वेगळी परंपरा होती. हा पलंग विशेषतः जावयासाठी राखून ठेवला जात असे. यावरून त्या काळात जावयाला दिला जाणारा मान आणि सन्मान स्पष्ट दिसतो.
आजच्या काळात फर्निचरच्या पलंगांनी आणि फोमच्या गाद्यांनी बाजेला विसरायला लावले असले, तरी गावाकडच्या अनेक घरांत अजूनही या परंपरेचे अवशेष सापडतात. या चित्राने आपल्याला स्मरण करून दिले पाहिजे की, आपल्या पुर्वजांचे जगणे किती सोपे, श्रमप्रधान आणि निसर्गाशी एकरूप होते.
आजच्या पिढीने या हरवणाऱ्या लोककलेचा अभ्यास करावा, आणि शक्य असेल तिथे जपणूकही करावी. कारण बाज ही केवळ झोपण्याचे साधन नव्हती, ती एक संस्कृती होती. जी आता फक्त अशा जुन्या छायाचित्रांमध्येच उरली आहे. लेखकाला काथ्याची ही बाज विणता येते.