Latest news | वीजपुरवठा खंडित झाला? आता ग्राहकांना मिळणार ५० रुपये प्रतितास नुकसान भरपाई; वर्धा ग्राहकास मिळाले तब्बल 9.12 लाख रुपये

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • नुकसान भरपाई हक्क

अहमदनगर | २३ मे | तुषार सोनवणे

(Latest news) नगर शहरात महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून नागरिक त्रस्त झाले आहेत तर कंपनी अधिकारी खुद्द राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपासह अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला जुमानत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे कायदेशिर हक्काचा आधार घेत नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी करावी. ६ तासापेक्षा जास्त काळ लाईट केली असेल तर ५० रूपये तासाप्रमाणे कायदेशिर नुकसाभरपाईचा ग्राहकाचा हक्क आहे. वर्धा येथील एका ग्राहकास महावितरणकडून तब्बल ९ लाख १२ हजार रूपये मिळाले आहेत.

(Latest news) शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रचंड उकड्यात आणि विजेअभावी नागरिकांना अक्षरश: हाल सहन करावे लागत आहेत. नेहमीप्रमाणे दर शनिवारी विद्युत महावितरण विभागाकडून मेंटेनन्ससाठी वीजपुरवठा बंद ठेवला जातो. याची नागरिकांनी मानसिक तयारी ठेवलेली असते. मात्र सध्या थोडा जरी वारा, पावसाचे थोडे थेंब जरी पडले वीजपुरवठा खंडित केला जातो.

(Latest news) विशेष म्हणजे वीज केव्हा येईल याची कोणतीही निश्चित माहिती नागरिकांना दिली जात नाही. महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन उचलला जात नाही. कधी उचलला गेला तरी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना उद्धट वागणूक दिली जाते. ‘तुमचं लाईट बिल भरलेलं आहे का?’ अशा स्वरूपाच्या प्रश्नांनी उलटसुलट बोलले जाते. ही वागणूक संतापजनक असून, सार्वजनिक सेवेतील जबाबदारीचा पूर्ण विसर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पडल्याचे दिसून येते.
     वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे शहरातील अनेक लहान दुकानदार, सेतू कार्यालय, सायबर कॅफे, सलून, वर्कशॉप्स, शालेय आणि महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची व इतर लघुउद्योगांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. दिवसभरात दोन-तीन वेळा वीज गेलेली असते आणि तेवढ्या वेळात त्यांचा व्यवहार ठप्प होतो. काही व्यावसायिकांनी आपले नुकसान भरून काढण्यासाठी जनरेटरचा आधार घेतला आहे, परंतु इंधन दरवाढीमुळे तोही परवडणारा पर्याय नाही.
   शहरातील राजकीय पक्ष भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी या प्रश्नावर आंदोलने केली परंतु फक्त आंदोलन करून नागरिकांची समस्या संपणार नाही. नागरिकांना झालेली आर्थिक नुकसान भरपाई या पक्षांनी विद्युत वितरण कंपनीकडून मिळून दिली पाहिजे, राजकीय पुढार्‍यांनी त्याचबरोबर नागरिकांनी नुकसान भरपाईसाठी आवाज उठवला पाहिजे.
    याविषयी कायद्यात स्पष्ट तरतूद आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) किंवा कोणतीही वीज वितरण कंपनी ग्राहकांना योग्य कारणाशिवाय किंवा नियमांचे उल्लंघन करून वीज पुरवठा खंडित करते किंवा वीज देत नाही, तर ग्राहक आर्थिक नुकसान भरपाई मागू शकतो. याबाबत भारतीय विद्युत कायदा आणि विद्युत नियामक आयोगाच्या २०१४ च्या नियमावली मध्ये तशा स्पष्ट तरतुदी आहे.
ग्राहक नुकसान भरपाई कधी मागू शकतो ?
विजपुरवठा खंडित झाल्यास नुकसान भरपाई : शहरी भागात : वीजपुरवठा खंडित झाला असेल आणि ६ तासांपेक्षा जास्त काळ (उदा., ओव्हरहेड वायर तुटणे) किंवा २४ तासांपेक्षा जास्त काळ (ट्रान्सफॉर्मर बिघाड) वीज सुरू झाली नाही, तर प्रत्येक तासासाठी ग्राहक ५० रुपये नुकसान भरपाई मागू शकतो.
ग्रामीण भागात : ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे वीजपुरवठा ४८ तासांपेक्षा जास्त खंडित झाल्यास, प्रत्येक तासासाठी ५० रुपये नुकसान भरपाई मागता येऊ शकते. वर्ध्यातील एका ग्राहकाला ९ लाख १२ हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मिळाली, अशी माहिती विद्युत लोकपालच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
 व्होल्टेज चढउतारामुळे नुकसान : जर वीजपुरवठ्यातील व्होल्टेजच्या चढउतारामुळे ग्राहकांच्या उपकरणांचे नुकसान झाले, तर भारतीय विद्युत नियम ५४ नुसार वीज कंपनीला नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.
  तक्रार निवारणाची प्रक्रिया : ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) कडे तक्रार दाखल करू शकतो. ही प्रक्रिया विनामूल्य आहे आणि दोन महिन्यांत निकाल देणे बंधनकारक आहे. जर CGRF चा निर्णय समाधानकारक नसेल, तर ग्राहक विद्युत लोकपाल (Ombudsman) कडे अपील करू शकतो.
तक्रार दाखल करण्यासाठी : https://www.mahadiscom.in/consumer/consumer-grievances-redressal-forum_mr/
ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी : https://edaakhil.nic.in/edaakhil/
वीज खंडित झाल्याची तारीख, वेळ, आणि त्यामुळे झालेले नुकसान (उदा., उपकरणांचे नुकसान, व्यवसायाचे नुकसान) यांचे पुरावे गोळा करा. तक्रार दाखल करा : महावितरणच्या ग्राहक सेवा केंद्रात (1912 किंवा 1800-212-3435) किंवा वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
कायदेशीर मार्ग : CGRF किंवा विद्युत लोकपालाकडे तक्रार दाखल करा. गरज पडल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे जाऊ शकता. नुकसान भरपाई मागण्यापूर्वी वीज खंडित होण्याचे कारण (उदा., तांत्रिक बिघाड, बिल थकबाकी, इ.) तपासा. जर कंपनीच्या चुकीमुळे वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता जास्त आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या वेबसाइटला भेट द्या : https://www.mahadiscom.in/en/useful-information-consumers/
   नुकतेच अहिल्यानगर विद्युत महावितरण कंपनीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. प्रत्यक्षात महावितरणची कामगिरी अत्यंत निराशाजनक असताना त्यांना मिळालेला हा पुरस्कार वशिल्याने मिळाला की काय ? अशी सामान्य नागरिकात चर्चा आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि मोठ्या पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून कामात कसूर केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक वैतागले असून, त्यांनी महावितरणच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्याची मागणी केली आहे.
    सर्व विजग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या लोकप्रतिनिधीला विजमंडळात राजकीय आंदोलन करण्याऐवजी नुकसान भरपाईचे फॉर्म भरण्यास सांगून ५० रूपये प्रति तासाप्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई पदरात पाडून घ्यावी.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *